भुयारी मार्गाची दुरावस्था!!
दैनिक जागर मराठी
चांदूर रेल्वे : अमरावती–मालखेड मुख्य मार्गावरील मालखेड गावा लगत रेल्वे भुयारी मार्गाखालील रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, लोक प्रतिनिधींनी पाहणी करून सूचना देऊनही रेल्वे प्रशासनावर त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. यापूर्वी लोकप्रतिनिधींनी या रेल्वे अंडरब्रिजला भेटी देत प्रत्यक्ष पाहणी केली होती. रेल्वे प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देखील दिल्या होत्या; मात्र तरीही प्रशासन कुणालाही जुमानत नसल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. पावसाळा संपूनही पुलाखालील रस्त्यावर साचलेले पाणी अद्याप तसेच आहे. सुमारे दोन फूट खोल खड्डा अक्षरशः जलाशयात रूपांतरित झाला आहे. हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीतही या साचलेल्या पाण्यातूनच वाहनचालक व प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. तसेच रस्त्याच्या आतील लोखंडी सळाख्या मोठ्या प्रमाणात उघड्यावर आल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांच्या चाकात त्या अडकून गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे रेल्वे प्रशासन पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. एखाद्याचा जीव गेल्यानंतरच रेल्वे प्रशासनाला जाग येईल का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला जात आहे हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा! मोठमोठ्या लोखंडी सळाख्या बाहेर निघाल्या आहे. चिखल व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रोज विद्यार्थी व नागरिकांना याच रस्त्याने प्रवास करावा लागतो. याआधीही अपघात झाले, पण, प्रशासन दुर्लक्षच करत आहे. एखाद्या जीवितहानीची वाट पाहत आहेत का? हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा. रस्ता दुरुस्त होईपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून रेल्वे गेट सुरू ठेवावे. - लता पाटील, सरपंच, मालखेड रेल्वे दररोज शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, प्रवासी व ग्रामस्थ याच रस्त्याचा वापर करतात. चिखल, दुर्गंधी व साचलेल्या पाण्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. या आधीही येथे अपघात झाले. रेल्वे प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
What's Your Reaction?








