त्यांना' पराभवाची भीती, जयंत पाटील यांचा भाजपवर निशाणा; आरक्षणावरुन आंबेडकरांवरही पलटवार!!!
महाराष्ट्रातील भाजपची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर असली तरी, दिल्लीतील श्रेष्ठींचा त्यांच्यावरचा विश्वास कमी झाला आहे. त्यामुळे अशा बैठका घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विभागनिहाय विधानसभेतील पराभवाचा अंदाज घेत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. किती जागा पडणार आहेत, याचा ते आढावा घेत असून फडणवीस आणि बावनकुळे यांच्यासाठी हा संदेश असल्याचा टोलाही पाटील यांनी लगावला. प्रकाश आंबेडकर यांनी निष्कर्ष काढून गैरसमज करू नये, असा टोलाही पाटील यांनी लगावला.नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी अमित शहा यांच्या दौऱ्यासह प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. बदलापूरचा आरोपी अक्षय शिंदेचे आम्ही समर्थन करत नाही. परंतु, या एन्काउंटरबाबत वेगवेगळी माहिती दिली जात आहे. ज्या संस्थेत केले त्या संस्थेचे पदाधिकारी आणि संस्थाचालक यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न का केला, असा सवाल उपस्थित करीत, गाडीत बसून त्याचा एन्काउंटर करायची गरज होती, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला. प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी आरोप केला म्हणजे तसे नसते. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील स्वतंत्रपणाने आंदोलन करीत आहेत. त्यांच्या मागण्या सरकारकडे मांडत आहेत. सरकार त्या बाबतीत लवकर निर्णय घेत नाही. जरांगेंचे आंदोलन असो किंवा ओबीसी समाजाचे, सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात असंतोष आहे. कोण कोणाच्या जवळ आहे असे निष्कर्ष काढून गैरसमज करणे चुकीचे आहे. ते त्यांच्या जीवावर आंदोलन करीत आहेत, असे ते म्हणाले.
What's Your Reaction?








