सोन्याची महागाई थांबेना, खिशाला कसे परवडणार? सर्वच रेकॉर्ड मोडत ९४००० पार; किमतीनं इतिहास रचला !!

Apr 2, 2025 - 09:45
 0  47
सोन्याची महागाई थांबेना, खिशाला कसे परवडणार? सर्वच रेकॉर्ड मोडत ९४००० पार; किमतीनं इतिहास रचला !!

मुंबई : सोन्याच्या किंमतीत दरवाढीचा ट्रेंड थांबायचं नाव घेत नाही आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याचा भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे तर सध्याचा भाव पाहून तर नोकरदारांना सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी आपली संपत्तीचं विकावी लागेल असं दिसत आहे. स्टॉकिस्ट आणि ज्वेलर्सनी केलेल्या खरेदीमुळे सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असून सराफा बाजारात सोन्याचा भाव २००० रुपयांनी वाढून ९४,१५० रुपये प्रति १० ग्रॅमच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला पण, चांदीची चकाकी मात्र काहीशी कमी झाली.

देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याचा भाव सतत हाताबाहेर जात असताना शेअर बाजारातील अलीकडच्या घसरणीच्या काळात मौल्यवान सोन्यात गुंतवणुकीचा ट्रेंड वाढत आहे. परदेशी बाजारातही सोन्याचे दर कडाडले असून आता सर्वांच्या नजरा अमेरिकन आर्थिक आकडेवारीवर असेल, ज्यामधून फेड रिझर्व्हकडून व्याजदरात कपात करण्याचे संकेत मिळतील.

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याची चमक २००० रुपयांची वाढली आणि प्रति १० ग्रॅम ९४,१५० रुपयांची नव्या उच्चांकावर झेप घेतली. यादरम्यान, गेल्या दोन महिन्यांत सोन्याच्या किमतीत एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ ठरली. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात, शुक्रवारी, सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९२,१५० रुपयांवर बंद झाला होता. ९९.५ टक्के शुद्ध असलेल्या सोन्याचा भावही २००० रुपयांनी वाढून ९३,७०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला, जी सोन्याची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी असून याआधी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९१,७०० रुपयांवर बंद झाला होता.

सोन्याच्या दरांमधील वाढ थांबता थांबेना
आदल्या दिवशी सोन्याच्या किमतीत एका दिवसातील सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली तर १० फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २,४०० रुपयांनी वाढला होता. त्याचवेळी, यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किंमत १४,७६० रुपये किंवा १८.६% वाढली असून १ जानेवारी रोजी सोन्याचा भाव ७९,३९० रुपये प्रति १० ग्रॅम होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow