इतिहासाचार्य प्रा.मा.म.देशमुख यांना समाज प्रबोधन पुरस्कार जाहीर
सत्यपाल महाराजांचा जन्मदिवस "प्रबोधन दिन" म्हणून साजरा होणार

अकोट विशेष प्रतिनिधी
सुप्रसिद्ध सप्तखंजरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा १६ मे हा जन्मदिवस दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा "प्रबोधन दिन" म्हणून मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा होणार आहे.यानिमित्ताने महाराजांचे अनुयायी रामपाल महाराज यांच्या शेंदुर्जना खुर्द या गावी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील नामवंत मंडळी या प्रबोधन दिनी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रधर्म प्रचार समितीचे संस्थापक आचार्य हरिभाऊ वेरुळकर, उद्घाटक म्हणून सत्यशोधक विचारवंत डॉ.सय्यद साहेब अहमदनगर,मुख्य सत्कारमूर्ती सत्यपाल महाराज,प्रमुख उपस्थिती म्हणून राजगड आदर्श गाव प्रणेते चंदू पाटील मारकवार,राष्ट्रसंत विचार प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक, मराठा सेवा संघाचे महासचिव मधुकर मेहकरे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमा बोके,गाडगे बाबा अभ्यासक संतोष अरसोड,ग.मा पिंजरकर, भदंत धम्मसेन,नितीन सरदार,एकनाथ महाराज राऊत,नरेंद्र महाराज दुधे, भाऊसाहेब थुटे,रवी मानव, नरेंद्र इंगळे तसेच महाराष्ट्रातील सर्व सप्तखंजरी वादक व प्रबोधन क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे.
दुपारी ४ ते रात्री १० या वेळात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महाराजांच्या नावाने दिला जाणारा "समाजप्रबोधन पुरस्कार" यावर्षी सुप्रसिद्ध विचारवंत व इतिहासाचार्य प्रा.मा.म. देशमुख यांना जाहीर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर दुपारी ४ वाजता प्रेमकुमार बोके यांच्या अध्यक्षतेखाली गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी पाच वाजता प्रबोधन अभ्यासिकेचे उद्घाटन आणि प्रबोधन अभ्यासिकेसाठी स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा संच सप्त खंजिरी प्रबोधनकार संघातर्फे देण्यात येणार आहे.सायंकाळी ७ वाजता सामुदायिक प्रार्थना आणि त्यानंतर ७-३० वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.८ वाजता प्रबोधन पुरस्कार सोहळा व त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मनोगत आणि शेवटी सत्यपाल महाराजांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होईल. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सप्तखंजरीवादक संदीपपाल महाराज व डॉ धर्मपाल चिंचोळकर आणि रामपाल महाराज यांच्या मार्गदर्शनात सुरू असून वेगवेगळ्या समित्या नेमण्यात आल्या आहे. त्या माध्यमातून अतिशय भव्य अशा या प्रबोधन दिनाचा कार्यक्रम संपन्न होणार असून सत्यपाल महाराजांवर प्रेम करणारा महाराष्ट्रातील मोठा जनसमुदाय या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गुरुदेव सेवा मंडळ व शेंदुर्जना खुर्द येथील समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे.
What's Your Reaction?






