शिवसेनेत मंत्रिपदासाठी ४० जण गोळा, विधान परिषद आमदारांचाही डोळा, शिंदेंचे मात्र तीन निकष ठरले !!

Dec 13, 2024 - 10:06
 0  22
शिवसेनेत मंत्रिपदासाठी ४० जण गोळा, विधान परिषद आमदारांचाही डोळा, शिंदेंचे मात्र तीन निकष ठरले !!

मुंबई : शनिवार १४ डिसेंबर रोजी महाराष्ट्र सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ११ ते १२ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशावेळी शिंदे मंत्रिपद भूषवलेल्या तीन ते चार आमदारांना डच्चू देऊन नवीन चेहऱ्यांची निवड करू शकतात.शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाची निवड ही तीन निकषांचा विचार करुन केली जाईल. प्रादेशिक आणि जातीय समीकरणांचा समतोल साधतानाच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन मंत्र्यांची निवड केलेली असेल. काही मंत्रिपदं फिरती ठेवली जाऊ शकतात. म्हणजे साधारण दोन वर्षांनंतर मंत्र्यांमध्ये फेरबदल करुन इतरांना मंत्री बनण्याची संधी दिली जाऊ शकेल. परंतु गृह खाते मिळवण्याची शिवसेनेची धडपड असली, तरी नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्यावर त्यांना समाधान मानावे लागेल.भाजप नेते गिरीश महाजन हे शिंदेंच्या सेनेच्या प्रतिनिधींच्या संपर्कात आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भावना गवळींसारख्या काही विधानपरिषद आमदारांचाही मंत्रिपदावर डोळा असल्याची चर्चा आहे. संजय राठोड, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यासारख्या माजी मंत्र्यांना वगळले जाऊ शकते. मंत्रिपदासाठी ४० हून अधिक इच्छुक असल्याने शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow