साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! २० डिसेंबरला साईबाबांचं समाधी मंदिर 'या' वेळेत दर्शनासाठी राहणार बंद !!
आहिल्यानगर: देशविदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांची इटालियन मार्बलच्या मूर्तीचे अत्याधुनिक थ्रीडी स्कॅनिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या दिसते तशी ही मूर्ती पुढील कित्येक पिढ्यांना पाहता येईल आणि तशी मूर्तीही पुन्हा घडविता येईल. मूर्तीची झीज होत असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयातील तंत्रज्ञ आणि यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या समितीच्या उपस्थिती २० डिसेंबर रोजी हे स्कॅनिंग होणार आहे. त्यादिवशी दुपारी पावणे दोन ते साडेचार यावेळत समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे, अशी माहिती शिर्डी संस्थानतर्फे देण्यात आली.मुंबईचे शिल्पकार भाऊसाहेब उर्फ बाळाजी तालीम यांनी शिर्डीतील साईंची मूर्ती बनवलेली आहे. १९५४ मध्ये या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सुरवातीच्या काळात मूर्तीला दूध आणि पाण्याने अंघोळ घातली जात असल्याने तिची हळूहळू झीज होऊ लागली. त्यामुळे ही पद्धत बदलण्यात आली. मूर्तीच्या स्नासाठी आता अतिगरम पाणी, दूध टाळण्यात येत आहे. मार्बल नैसर्गिकदृष्ट्या थंड गुणधर्माचे असते. त्यामुळे गरम पाणी आणि दही-दुधामुळे त्याला हानी पोहचते. याची पाहणी केल्यानंतर तज्ज्ञांनी काही सूचना केल्याने त्यानुसार काळजी घेण्यात येऊ लागली. मात्र, काळानुरुप मूर्तीच झीज होतच आहे. त्यामुळे पुढील पिढ्यांना मूळ स्वरूपातील मूर्ती पहायला मिळते की नाही, अशी शंका उपस्थित होऊ लागली. त्यातून या मूर्तीचे थ्रीडी स्कॅनिंग करून तो डेटा संरक्षित केला तर भविष्यात आज आहे, तशी मूर्ती पाहता येईल, हा डेटा वापरून तशीच मूर्ती बनविता येऊ शकेल, अशी संकल्पना पुढे आली.
What's Your Reaction?








