स्थानिक उमेदवार अनिवार्य करण्यासाठी नियमांत बदल व्हावा !!

Dec 6, 2025 - 17:04
 0  9
स्थानिक उमेदवार अनिवार्य करण्यासाठी नियमांत बदल व्हावा !!

दैनिक जागर मराठी 


    दिग्रस प्रतिनिधी : संतोष राठोड 

    महाराष्ट्रातील नगर परिषद व नगर पालिका निवडणुकांमध्ये उमेदवार ज्या प्रभागातून निवडणूक लढवत आहे तो त्याच प्रभागाचा मतदार असणे बंधनकारक करावे, अशी जनहिताची मागणी सामाजिक कार्यकर्ते मो. शहबाज मो. अकील यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे दि.२ डिसेंबर रोजी लेखी स्वरूपात सादर केली आहे. सध्या निवडणूक प्रक्रियेत अनेक प्रभागांत बाहेरील उमेदवार निवडणूक लढवतात. संबंधित प्रभागातील समस्या, लोकांच्या अपेक्षा व विकासाचा आराखडा याबाबत त्यांना पुरेशी माहिती नसल्याने प्रशासन आणि नागरिकांतील अपेक्षित समन्वय साधला जात नाही. परिणामी प्रभागाचा विकास मर्यादित राहतो.मो. शहबाज यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, स्थानिक उमेदवाराला प्रभागातील प्रश्नांची खरी जाण असते, नागरिकांचा विश्वास व लोकप्रतिनिधींची जबाबदारी दृढ होते, मतदारांना उमेदवाराचे पूर्वीचे काम व सामाजिक योगदान माहित असल्याने मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक होते. स्थानिक नेतृत्व बळकट होते व विकासाची गती वाढते याकरिता “निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचा मतदार म्हणून समावेश अनिवार्यपणे त्याच प्रभागात असावा” अशी तरतूद नियमावलीत करण्यात यावी, अशी ठोस भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधित्व बाहेरील व्यक्तींनी नव्हे तर त्या परिसरातीलच नागरीकांनी केले पाहिजे. हा नियम लागू झाल्यास नगर पालिका व नगर परिषद निवडणुका अधिक जबाबदार व लोकाभिमुख ठरतील. महाराष्ट्रातील नागरी स्वराज्य व्यवस्थेला मजबुती देण्यासाठी तसेच प्रभागनिहाय विकासाची गती वाढवण्यासाठी या मागणीची प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनातून मो. शहबाज मो. अकील यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow