रोड रोमिओने त्रास दिल्याने १२ वर्षीय मुलीची आत्महत्या; वडिलांनी तपास करून आरोपींना…

Oct 8, 2024 - 04:09
 0  83
रोड रोमिओने त्रास दिल्याने १२ वर्षीय मुलीची आत्महत्या; वडिलांनी तपास करून आरोपींना…

टीम जागर मराठी 

पिंपरी- चिंचवड |औद्योगिक नगरी आणि स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी- चिंचवडमध्ये गुन्हेगारी काही प्रमाणात डोके वर काढत आहे. पाच महिन्यांपूर्वी भोसरीमध्ये रोड रोमिओंच्या त्रासाला कंटाळून अवघ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उजेडात आली. आश्चर्यकारक म्हणजे पोलिस नव्हे तर आत्महत्या केलेल्या मुलीच्या वडिलांनी तपास करून आणि माहिती काढून सीसीटीव्हीच्या आधारे खऱ्या आरोपींचा शोध घेतला. आपल्या मुलीला न्याय दिला. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. भोसरी पोलिसांनी देखील तात्काळ कठोर पाऊल उचलत आरोपी क्षितिज लक्ष्मण पराड (वय २० वर्ष)आणि तेजस पांडुरंग पठारे (वय १९ वर्ष) या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

सविस्तर माहिती अशी की, अल्पवयीन बारा वर्षीय मुलीने ६ जून २०२४ रोजी राहत्या घरात रात्री साडेसातच्या सुमारास बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे अवघे कुटुंब दुःखात लोटले गेले. फिर्यादी हे चहा विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांची चहाची टपरी आहे. यातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागतो. परंतु, पोटचा गोळा असलेल्या मुलीने आत्महत्या का केली? असा प्रश्न सतत वडिलांना पडत असल्याने त्यांनी नैराश्यात न जाता स्वतः तपासाला सुरुवात केली. सीसीटीव्ही तपासले, परिसरात चौकशीही केली. याच दरम्यान, बारा वर्षीय मुलीच्या खिशात आरोपीच्या मोबाईल नंबरची चिठ्ठी मिळाली. यामुळे आरोपी हे मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देत होते. तिचा लैंगिक छळ करत असल्याचा आरोप पालकांनी करत भोसरी पोलीस ठाण्यात ५ ऑक्टोबर २०२४ रोजी फिर्याद दिली. त्यानुसार, भोसरी पोलिसांनी देखील तात्काळ गुन्हा दाखल करून क्षितिज लक्ष्मण पराड आणि तेजस पांडुरंग पठारे या दोघांना अटक केली आहे. ज्यावेळी अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली तेव्हापासून भोसरी पोलिसांनी काहीच तपास केला नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे. वडिलांना तत्परतेने चौकशी करून आणि सीसीटीव्ही फुटेज मिळवून तपास का करावा लागला? अशी वेळ पालकांवर पोलिसांनी का आणली? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow