सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने अल्पावधीतच रस्ते उखडले !!
दैनिक जागर मराठी
अचलपूर : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध उपविभागात करण्यात येत असलेली कामे आणि झालेली बांधकामे निकृष्ट असल्याचे ठळकपणे दिसून येत आहे. केवळ तीन महिन्यांच्या आतच सिमेंटचे नवीन रस्ते उखडले आहे आणि रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या आहे. अभियंते आणि कंत्राटदारांच्या संगणमताने सुरू असलेल्या खावूगिरीमुळे जनतेचा पैसा व्यर्थ जात आहे. दरवर्षी विविध हेड अंतर्गत अचलपूर विभागांतर्गत अचलपूरसह चिखलदरा, धारणी आणि चांदूरबाजार येथील रस्ते बांधकाम, इमारती बांधकाम याकरिता कोट्यवधींचा निधी प्राप्त होत असतो. या निधीमधून सिमेंट व डांबरी रस्ते, पुल, रपटे, वॉल कंम्पाउंड, शासकीय इमारतींचे बांधकाम, समाज मंदिर बांधकाम, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत विकासकामे अशी कामे करण्यात येते. मात्र बांधकामांकडे केवळ बक्कळ पैसा कमविण्याचे माध्यम म्हणून पाहण्याची परंपरा अजूनही अखंडितपणे सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालयांतर्गत मेळघाट सारख्या अतिदुर्गम १०० किमी अंतरावर बांधकाम होत असताना त्याकडे कार्यकारी अभियंता यांचे दुर्लक्ष होऊ शकते. मात्र कार्यकारी अभियंता यांच्या कक्षापासून हाकेच्या अंतरावर आणि त्यांच्या परिसरातच निकृष्ट बांधकाम होत असेल, तर अशी कार्यप्रणाली निश्चितच आक्षेपार्ह ठरते. उल्लेखनीय म्हणजे सर्वसामान्य माणसांना कळले की, बांधकामात वाळू ऐवजी दगडाचा भुसा वापरला जात आहे. ही बाब कार्यकारी अभियंता यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मात्र थातूरमातूर सांगून वेळ मारून नेण्यात आली. गौरखेडा कुंभी येथील नितीन शिंदे यांनी त्यांच्या ग्रामपंचायतींतर्गत झालेल्या बोगस रस्ता बांधकामाच्या अनेकवेळा तक्रारी केल्या. स्वतः कार्यकारी अभियंता यांनी प्रत्यक्ष जाऊन बोगस बांधकामांचे निरीक्षण केले. अहवाल देतो म्हणून तक्रारदार नितीन शिंदे यांना सांगण्यात आले. मात्र वर्ष संपायला आले तरीही कारवाई झाली नाही. दरम्यान, नितीन शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांना याबाबत पुन्हा स्वतंत्र तक्रारी देऊन पाठपुरावा केला. त्यावर मुख्य अभियंता गिरीश जोशी यांची स्वाक्षरी असलेले पत्र ११ फेब्रुवारी रोजी कार्यकारी अभियंता यांना पाठविण्यात आले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंडळ, अमरावतीच्या रूपा गिरासे यांनीसुद्धा त्याच तारखेला कार्यकारी अभियंता यांना पत्र दिले. दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश दिले. तरीसुद्धा नितीन शिंदे यांच्या पत्राबाबत कार्यकारी अभियंता यांनी आपले मौन सोडले नाही.अन्यथा उपोषण यापूर्वी गौरखेडा कुंभी येथील बोगस सिमेंट रस्ता बांधकामाची चौकशी होत नसल्याने आपण उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, संबंधित कंत्राटदाराने काही साथीदारांसोबत ग्रामस्थांसमोरच माझ्यावर हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यामुळे उपोषण स्थगित केले होते. अद्यापही मला बांधकाम विभागाकडून माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे आता पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे
What's Your Reaction?








