टेंब्रूसोंडा येथे चिखलदरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न!!

Dec 20, 2025 - 14:32
 0  6
टेंब्रूसोंडा येथे चिखलदरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न!!

दैनिक जागर मराठी 
प्रशांत पंडोले
चिखलदरा : शिक्षण विभाग, पंचायत समिती चिखलदरा, मुख्याध्यापक संघ व विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री दादासाहेब गवई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, टेंब्रूसोंडा येथे चिखलदरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, नवकल्पनांना चालना मिळावी तसेच विज्ञानातील संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगातून समजाव्यात, या उद्देशाने सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात चिखलदरा तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित विविध विषयांवरील नावीन्यपूर्ण विज्ञान प्रतिकृती सादर केल्या. विशेष बाब म्हणजे कै. सुधाकरराव नाईक माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा, सलोना येथील विद्यार्थिनींनी आपल्या सादरीकरणातून परीक्षकांचे लक्ष वेधून घेत उल्लेखनीय यश संपादन केले. माध्यमिक गटातून विद्यार्थिनी स्वामी रामू चिमोटे व अक्षरा सर्जु बेठेकर यांनी सादर केलेल्या हवा शुद्धीकरण यंत्र या विज्ञान प्रतिकृतीस द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. सदर प्रतिकृतीत वाढते वायू प्रदूषण, त्याचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच स्वच्छ व शुद्ध हवेचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले होते. त्यांच्या या नावीन्यपूर्ण व उपयुक्त संकल्पनेची दखल घेत परीक्षकांनी सदर प्रतिकृतीची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड केली आहे. या यशामागे शाळेच्या विज्ञान शिक्षिका आरती सुधाकरराव सोनटक्के तसेच विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष उमेश नारायणराव धोटे यांचे मोलाचे व सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थिनींना संकल्पना समजावून देत प्रतिकृती तयार करण्यापासून सादरीकरणापर्यंत योग्य दिशा दिली. या उल्लेखनीय यशाबद्दल गटविकास अधिकारी विनोद खेडकर गटशिक्षण अधिकारी, भट्टेसिंग गिरासे, आदिवासी गाविलगढ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गौरीशंकर काळे, मेलघाट विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आ. केवलराम काळे, माजी आ. प्रभुदास भिलावेकर, प्राचार्य चारुलता अभ्यंकर, पर्यवेक्षक अजयसिंग तरवले, व्यवस्थापक अर्जुन प्रतापराव अभ्यंकर विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष उमेश धोटे, उपाध्यक्ष अभय चित्रकार, शुभांगी वानखडे, सचीव योगेश गायकवाड, शेख मोहसीन तसेच शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक योगेश धुमाळे यांनी यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व वैज्ञानिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow