लोकसभेपेक्षा आठ टक्क्यांनी बढत, साताऱ्यात अटीतटीची लढत; वाढलेला टक्का कुणाच्या पथ्थ्यावर !!

Nov 21, 2024 - 06:27
 0  30
लोकसभेपेक्षा आठ टक्क्यांनी बढत, साताऱ्यात अटीतटीची लढत; वाढलेला टक्का कुणाच्या पथ्थ्यावर !!

सातारा | जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच खरा सामना आहे. आठ विधानसभा मतदारसंघात एकूण १०९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. यामध्ये ५७ अपक्ष उमेदवार आहेत. सातारा कोरेगाव, माण, फलटण, कराड उत्तर व कराड दक्षिणमध्ये दुरंगी लढती आहेत. तर पाटण व वाई या दोन मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी व महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याने अपक्षांनी उमेदवारांची गणिते बिघडवली आहेत.सातारा जिल्हा काबिज करण्यासाठी महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि महाविकास आघाडीत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष, काँग्रेस व शिवसेनेत (उबाठा) यांच्यात चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले होते. मतदान होईपर्यंत राजकीय धुमशान सुरुच होते.जिल्ह्यात ७१ टक्के मतदान झाले. गत विधानसभा निवडणुकीत ६७ टक्के, तर गत लोकसभा निवडणुकीत ६३ टक्के मतदान झाले होते. आता वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. शनिवार, दि. २३ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यावेळी आठही विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी कोणाला मिळणार, हे स्पष्ट होईल. मतदान केल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष मतमोजणीकडे लागून राहिले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow