दापोरी येथील जिल्हा परिषद शाळेचा 'आदर्श ' अनोखा उपक्रम !

Sep 24, 2024 - 12:03
 0  63
दापोरी येथील जिल्हा परिषद शाळेचा 'आदर्श ' अनोखा उपक्रम !

मोर्शी /तालुका प्रतिनिधी 

मोर्शी तालुक्यातील एकमेव आदर्श शाळा !

 गावकरी व शिक्षकांच्या सामूहिक प्रयत्नातून शाळेचा कायापालट !

 मोर्शी - विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी आदर्श शाळा कशी असावी असा प्रश्न पडल्यास अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील जिल्हा परिषदेची शाळा हि उत्तम उदाहरण ठरेल. 

या शाळेत शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शाळेच्या व्यतिरिक्त वेळेतही शिक्षणाचे धडे दिले जातात. अल्पकालावधीतच शिक्षक व ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नाने या शाळेचा कायापालट झाला. त्यातूनच इंग्रजी माध्यमाच्या संस्कृतीकडे वळणारी पावले दापोरी येथील जिल्हा परिषद शाळेकडे वळू लागली .

शिक्षनाच्या खालावलेल्या दर्जातून राज्यातील जिल्हा परिषदेच्या किंवा महापालिका, नगर पालिकांच्या शाळा कालबाह्य़ होत आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेची संस्कृती मोडकळीस निघत आहे. याला काही अपवादही आहेत. असाच अपवाद ठरली आहे मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील जिल्हा परिषदेची शाळा. 

    दोन हजार सातशे लोकसंख्या असलेल्या दापोरी गावात १८ /१०/१८७९ मध्ये स्थापन झालेल्या जिल्हा परिषद शाळेला आज १४५ वर्षांचा कालावधी पूर्ण होत असून १४५ वर्षानंतर हजारो विद्यार्थी घडविणारी ही जिल्हा परिषद शाळा आपल्या कर्तुत्वाचा ठसा जिल्ह्यात उमटवितांना दिसत आहे. 

अमरावती जिल्ह्यात आजही काही जिल्हा परिषद शाळांची व इतर शासकीय शाळेप्रमाणाचे दयनीय अवस्था निदर्शनास येत आहे. मात्र दापोरी गावातील नागरिकांनी पालकांनी आपले पाल्य गावापासून दूरवर शहरातील शाळेत पाठविण्यासाठी नकार दिला आणि जिल्हा परिषद शाळेवर विश्वास दाखविला असून जिल्हा परिषद शाळा आदर्श बनविण्यासाठी गावकरी मुख्याध्यापक शिक्षक यानिमित्ताने एकत्र आले. त्यासाठी त्यांनी स्वत: जवळील पैसे गोळा केले. शिक्षकांच्या या विधायक कार्याला गावकऱ्यांनीही एकदिलाने साथ दिली व या कार्यात गावकऱ्यांनी व शिक्षकांनी अनमोल वाटा उचलला. त्या माध्यमातून शाळेचा कायापालट करण्यात आला. शाळेची रंगरंगोटी, भिंतीवरील बोलकी चित्र प्रदर्शनी विध्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे शिकवितांना दिसत आहे, शाळेमध्ये विविध रंगांची फुलझाडे, शाळेतील विध्यार्थ्यांना खेळाच्या सेवा सुविधा, स्वतंत्र अभ्यासिका, कॉम्प्युटर लॅब, विद्यार्थ्यांसाठी बँक, मुलभूत सोयीसुविधा करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त अशा अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आल्या. भौतिक सुविधांची व्यवस्था झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी लक्ष्य केंद्रित करण्यात आले. मागील अनेक वर्षापासून या शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा आपला ठसा उमटवीत असून या शाळेने जिल्हा क्रीडा सर्धेमध्ये अनेक मेडल प्राप्त करून खोखो , कबड्डी यासारख्या खेळामध्ये येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. यासाठी शिक्षकांनी पूर्ण वेळ शाळेसाठी देऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचे अनमोल कार्य करतांना दिसत आहे .या शाळेमध्ये विध्यार्थ्यांकरिता वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून शिक्षणाचे धडे दिले जातात. 

        या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत या शाळेची पटसंख्या दापोरी जिल्हा परिषद शाळेची नावलौकिकता वाढल्यामुळे आता पटसंख्या ही तब्बल १७८ च्या पुढे गेली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये असा उपक्रम राबविल्यास एखाद्या नामांकित खासगी शाळेप्रमाणे या जिल्हा परिषद शाळेवर देखील 'हाऊसफुल्ल'चा फलक लावल्या जाऊ शकतो. सहा शिक्षकांचे परिश्रम आणि त्याला गावकऱ्यांची मिळालेली साथ यामुळे एका वर्षांत या शाळेच रूपडं पालटलं. शाळेचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक यांच्यासह ग्राम पंचायत, शाळा व्यवस्थापन समितीने शाळेत व्यापक परिवर्तन आणण्याचा निर्धार केला. या शिक्षकांनी स्वत: मेहनत करून शाळेला एक नव रूप दिले. गावकऱ्यांनी सकारात्मक पाउल उचलत शिक्षकांच्या या उपक्रमाला सहकार्य केले व गावातील शाळेला आदर्श बनविण्यास सहकार्य केले. 

 

जिल्ह्यातील शाळांमध्ये असा आदर्श 'पॅटर्न ' राबवावा..

दापोरी येथील जिल्हा परिषद शाळा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असून, या शाळेचा पॅटर्न अन्य जिल्हा परिषद शाळेत राबविण्याचा निर्धार अमरावती जिल्हा परिषद प्रशासनाने करायला हवा. दापोरी जिल्हा परिषद शाळेत अनोखे उपक्रम राबविल्याने आणि शाळेत आवश्यक त्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध झाल्याने विद्यार्थी आनंदाने हसत खेळत शिक्षण घेतांना दिसत. दापोरी येथील शाळेचा हा उपक्रम जिल्हय़ातील अन्य जिल्हा परिषद शाळांनी राबविल्यास जिल्हा परिषद शाळांवर पालकांचा विश्वास बसेल अशी अपेक्षा आहे

  रुपेश वाळके 

ग्राम पंचायत सदस्य. 

----------------------

गावकऱ्यांनी व शिक्षकांनी एकत्र येत शाळेत परिवर्तन घडवण्याला सुरुवात केली. गावकऱ्यांची अनमोल साथ मिळाली, त्यामुळे हे शक्य झाले. शाळेतील विद्यार्थ्यांना हसत खेळत दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वसुविधा पुरवण्याचा आम्ही सर्व शिक्षक प्रयत्न करीत आहे.

गजानन चौधरी 

मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा, दापोरी

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow