पुण्यामध्ये चंद्रकांत पाटलांच्या विजयाच्या बॅनर्सची चर्चा, कोथरूडमध्ये तिरंगी लढतीत कोण उधळणार गुलाल !!

Nov 22, 2024 - 05:32
 0  17
पुण्यामध्ये चंद्रकांत पाटलांच्या विजयाच्या बॅनर्सची चर्चा, कोथरूडमध्ये तिरंगी लढतीत कोण उधळणार गुलाल !!

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या निकालाला काही तास बाकी आहेत. मात्र राज्यभरात उमेदवारांच्या समर्थकांनी निकालाआधीच विजयाचे बॅनर्स लावले आहेत. खास करून पुण्यामध्ये हे बॅनर्स झळकताना दिसतायेत. अशाताच पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि नेते चंद्रकांत पाटील यांच्या बॅनर्सची चर्चा होत आहे. चंद्रकांत दादांच्या विजयाचे बॅनर्स कोथरूड मतदारसंघामध्ये लागले आहेत. याचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कोथरूड मतदारसंघामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली होती.
कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून चंद्रकांत पाटील, शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत मोकाटे आणि मनसे किशोर शिंदे अशी तिरंगी लढत झाली. माजी मंत्री राहिलेल्या पाटलांचं पारडं जड होतं. कोथरूडकरांनी दादांनाचा मागील निवडणुकीमध्ये पसंती दिली होती. मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापत त्यांच्या जागी दादांना २०१९ मध्ये उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे ब्राह्मण समाजाने त्यावेळी नाराजी दर्शवली होती. मात्र तरीही चंद्रकांत पाटील यांनी विजय मिळवला होता. २०१४ मध्ये मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेच्या मोकाटे यांचा पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीमध्ये तिंरगी लढत झाल्यावर विजयाचा गुलाल कोण उधळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow