आमदार किशोर जोरगेवार म्हणतात निधी दिला,आता महिन्याभरात काम पूर्णत्वाकडे न्या !
बाबूपेठ उड्डाण पुलाच्या कामाची केली पाहणी
दैनिक जागर मराठी
शंकर महाकाली
चंद्रपूर (प्रतिनिधी) :
बाबूपेठ उड्डाणपूलाच्या बांधकामात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण वेळोवेळी प्रयत्न केले. शेवटच्या टप्यातील काम निधीअभावी रखडल्याचे लक्षात येताच आपण ५ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आता युद्धपातळीवर काम करून महिन्याभरात काम पूर्ण करत उड्डाणपुल नागरिकांसाठी सुरू करा असे निर्देश आ. किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आ. जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह बाबूपेठ उड्डाणपुलाची पाहणी केली.
बाबूपेठ उड्डाणपूल चंद्रपूरातील प्रमुख समस्यांपैकी एक समस्या होती. हा पूल व्हावा यासाठी बाबूपेठ वासीयांच्या वतीने अनेक आंदोलने करण्यात आली. दर पाच मिनिटाला येथील रेल्वेगेट बंद होतो. येथून मध्य रेल्वे लाईन आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे लाईन आहे. परिणामी दोन्ही गेट बंद राहत असल्याने नागरिकांना तासनतास येथे उभे राहावे लागत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत होता. ही बाब लक्षात घेता येथे रेल्वे उड्डाण पूल तयार करण्याच्या दिशेने आ. जोरगेवार यांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र अनेक तांत्रिक अडचणींमध्ये हा पूल अडकला होता. अखेर पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र रेल्वे विभागाच्या तिसऱ्या रुळाच्या कामासाठी पुन्हा या पुलाचे काम मंदावले होते. त्यानंतर आ. जोरगेवार यांनी सातत्याने प्रयत्न करत सदर पुलाच्या कामाला गती दिली. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना निधीअभावी सदरहु काम परत एकदा रखडले होते.
यासाठी आ. जोरगेवार यांनी मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेत सदरहु कामाला लागणारा ५ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी सदरहु निधी मंजूर करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता. शेवटी त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. बुधवारी सदर कामासाठी नगर विकास विभागाच्या वतीने ५ कोटी ४९ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. त्यांनी सदर कामासाठी आपण निधी उपलब्ध करून दिला आहे. आता येथील कामाला गती देण्यात यावी, युद्धपातळीवर हे काम पूर्ण करून महिन्याभरात सदरहु पुल नागरिकांच्या सेवेत सुरू करावा असे निर्देश अधिका-यांना दिले आहे. यावेळी निधी मंजूर केल्याबद्दल बाबूपेठ येथील नागरिकांनी पुष्पगुच्छ देत आ. जोरगेवार यांचे आभार मानले.
What's Your Reaction?








