पुण्यात शरद पवार गटाच्या आमदाराच्या विजयाचे बॅनर, निकालाआधीच जंगी मिरवणूक !!

Nov 21, 2024 - 06:22
 0  23
पुण्यात शरद पवार गटाच्या आमदाराच्या विजयाचे बॅनर, निकालाआधीच जंगी मिरवणूक !!

पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. मागील वर्षीपेक्षा यंदाच्या निवडणुकीमध्ये जास्त मतदान झाले. महाराष्ट्र राज्यात एकूण ६५ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ७६.२५ टक्के, तर मुंबई शहरामध्ये सर्वात कमी मतदान ५२.०७ टक्के मतदान झाले. यंदा वाढलेल्या मतदानाचा टक्क्याने कोणाला फटका बसणार आणि जास्तीचे मतदान कोणाला तारणार हे पाहावं लागणार आहे. आता सर्व दिग्गज आणि नव्या उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत असून दोन दिवसांनी म्हणजेच २३ नोव्हेंबरला निकाल येणार आहे. मात्र पुण्यात शरद पवार गटाच्या आमदाराचे निकालाआधीच विजयाचे पोस्टर्स लागले असून त्यांची विजयी रॅलीसुद्धा काढण्यात आलीये. पुण्यामधील खडकवासला मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली आहे. शरद पवार गटाकडून सचिन दोडके, मनसेकडून मयुरेश वांजळे आणि भाजपकडून भीमराव तापकीर असा तिरंगी सामना झाला आहे. विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना भाजपने शेवटच्या काही याद्यांमध्ये तिकीट जाहीर झाले होते. तर सचिन दोडके मागील निवडणुकीमध्ये फक्त अडीच हजार मतांनी पराभूत झाले होते. यात मतदारसंघात मनसेचे दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे मैदानात असल्याने लढत एकदम चुरशीची होणार यात काही शंका नाही. मात्र निकालाआधीच वारजे माळवाडीमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार सचिन दोडके यांच्या समर्थकांनी त्यांचे विजयाचे पोस्टर लावले आहेत. सोशल मीडियावर या पोस्टरची जोरदार चर्चा आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow