शिवाजी आढळराव पाटील यांनी बोलावली अतितातडीची बैठक, बराच वेळ खलबतं, अखेर काय ठरलं?

Feb 29, 2024 - 17:45
 0  42
शिवाजी आढळराव पाटील यांनी बोलावली अतितातडीची बैठक, बराच वेळ खलबतं, अखेर काय ठरलं?

 पुणे : शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी आज पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली. शिरुर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी, अशी शिवाजी आढळराव पाटील यांची इच्छा आहे. पण शिरुर लोकसभेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे हे खासदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा या मतदारसंघावर दावा आहे. या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे निवडणूक लढण्याची शक्यता असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या. पण शिवसेनेचे नेते शिवाजी आढळराव पाटील हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे यासाठी ते अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावरही निवडणूक लढण्यास तयार आहेत. यासाठी त्यांनी आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

“शिरूर लोकसभा मतदारसंघ गेल्या आठवडाभर चर्चेत आहे. आढळराव हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, प्रदीप कंद राष्ट्रवादीत जाणार, अगदी पार्थ पवार इथून निवडणूक लढवणार, या चर्चेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मी काल पुन्हा भेटलो. ते म्हणाले अद्याप जागांचे वाटप झालेले नाही. मात्र अजित पवार म्हणाले त्यांचे आमदार जास्त आहेत. त्यामुळे त्यांनी या मतदारसंघावर हक्क गाजवला आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला म्हणाले”, अशी प्रतिक्रिया शिवाजी आढळराव पाटील यांनी दिली.

“कदाचित त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडे जाऊ शकते. त्या अनुषंगाने मला जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढवण्याबाबत मला विचारणा झाली तर काय करायचं? याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. कार्यकर्तेही म्हणत आहेत की, राष्ट्रवादीला जागा सुटली तर आपण घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवू. पण शेवटचा आदेश हा मुख्यमंत्र्यांचा आहे”, असं शिवाजी आढळराव पाटील म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow