'राज कुमार यांनी त्याला इतके मारले की त्याचा मृत्यू झाला' !!

Mar 31, 2025 - 09:35
 0  29
'राज कुमार यांनी त्याला इतके मारले की त्याचा मृत्यू झाला' !!

मुंबई: 'ट्वीस्ट अँड टर्न्स' असणारे अनेक चित्रपट आपण पाहतो, मात्र कधीकधी या सिनेकलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घटना अधिक आश्चर्यकारक असतात. अलीकडेच एएनआयला दिलेल्या मुलाखतीत, ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांनी सुपरस्टार राज कुमार यांच्या आयुष्यातील असा एक धक्कादायक प्रसंग उघड केला, ज्याबद्दल फारसे कुणाला माहीत नाही.

अनोख्या आवाज, शांत स्वभाव आणि दिमाखदार स्क्रीन प्रेझेन्ससाठी ओळखले जाणाऱ्या राज कुमार यांनी भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अनेक गाजलेले चित्रपट केले. त्यांचे वैयक्तिक आयुष्य त्यांच्या काळात अनेकदा चर्चेत आलेले. आता अभिनेते रझा मुराद यांनी त्यांच्याबद्दल एक वादग्रस्त घटनेवरुन पडदा हटवला. रझा यांनी राज कुमार यांच्या आयुष्यातील ती घटना सांगताना असे म्हटले की, 'एकदा राज सर त्यांचा एका मित्र आणि त्याच्या गर्लफ्रेंडसह जुहू बीचवर होते. त्या महिलेबद्दल कोणीतरी चुकीची टिप्पणी केली. राज सर संतापले, त्यांनी त्या माणसाला इतके मारले की, त्याचा मृत्यू झाला.'

राज कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल


ANI ला दिलेल्या मुलाखतीत रझा पुढे म्हणाले की 'आणि राज साहेबांवर खुनाचा खटला होता. माझे वडील त्यांचे खूप चांगले मित्र होते, म्हणून ते त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक न्यायालयीन सुनावणीला जात असत.' त्यांनी पुढे असेही म्हटले की, या घटनेमुळे दीर्घ कायदेशीर लढाई झाली. राज कुमार यांची याप्रकरणात निर्दोष मुक्तता झाली होती.रझा म्हणाले की, 'हा एक दीर्घकाळ चाललेला खटला होता पण शेवटी त्यांना निर्दोष सोडण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेला अनेक महिने लागले.' ही वादग्रस्त घटना घडली तरीही रझा यांनी राज कुमार यांचे वर्णन स्वतःच्या अटींवर आयुष्य जगणारा माणूस अशा शब्दात केले. रझा म्हणाले की, 'ते एक काश्मिरी पंडित होते आणि चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी ते पोलिस उपनिरीक्षक होते, नंतर ते एक मोठे स्टार झाले.'

राज कुमार यांच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी कारकिर्दीमध्ये ७० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. राज कुमार यांचे १९९६ मध्ये वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow