मी हुशार किंवा मोठा माणूस नाही, चुका होऊ शकतात, कर्जमाफीच्या वक्तव्यावर कोकाटेंचा खुलासा !!
पुणे : ‘शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक केल्याशिवाय शेतकरी आता शेती करू शकणार नाही. पैसे नसल्याने शेतकरी कर्ज काढतो आणि कर्जबाजारी होतो. तो सातत्याने अडचणीत आला, की सरकार मदत करत नाही. या परिस्थितीत तो निराश होऊन वेगळा विचार करतो. हे चक्र थांबविण्यासाठी शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करणे आवश्यक झाले आहे. सरकारी खर्चाने शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्याबाबत विचार सुरू आहे,’ असे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी सांगितले.
बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित राज्यस्तरीय कृषी अधिकारी व कर्मचारी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल, विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग, राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर, स्मार्ट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर, ‘महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळा’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदवले, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक विनायक कोकरे, ‘पाणी फाउंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ उपस्थित होते.
‘देशात ५० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. हवामान बदलामुळे शेतीपुढील आव्हाने वाढली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणे, नवीन तंत्रज्ञानाची त्याला माहिती देणे गरजेचे आहे. बदलत्या काळात शेती सुरक्षित कशी होईल, कमी खर्चात चांगल्या दर्जाचे उत्पादन कसे वाढवता येईल, या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. उत्पादनाची गुणवत्ता राखणे, त्याची जाहिरात करणे, बाजारपेठ आणि बाजारभाव मिळणे ही मूल्यसाखळी निर्माण करावी लागणार आहे,’ असे कोकाटे यांनी सांगितले.‘मी हुशार किंवा मोठा माणूस नाही. सामान्य घरातून आलो आहे. त्यामुळे वागण्या-बोलण्यात चुका होऊ शकतात. मात्र, माझा हेतू प्रामाणिक आहे,’ असे सांगून कोकाटे यांनी कर्जमाफीच्या वक्तव्यावरून झालेल्या गोंधळावर खुलासा केला.
मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना अधिकार दिले नाहीत, ही बातमी वाचली. वास्तविक प्रत्येकाला दिलेली जबाबदारी त्याने पार पाडण्याची गरज आहे,’ असे आशिष जैस्वाल म्हणाले. हा धागा पकडून माणिकराव कोकाटे यांनी, ‘आपल्याला काय जबाबदार दिली हे जास्त महत्त्वाचे आहे. मला तर मंत्रिपदाचेही काही वाटत नाही. मला कधीही मंत्रिपदाच्या अपेक्षा नव्हत्या,’ असे सांगून, ‘कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार आमच्याकडे नाहीत,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
What's Your Reaction?








