'कोल्हापूर उत्तर' जागा आमचीच... राजेश क्षीरसागर यांचा घुमजाव, 'दक्षिण'वरही केला दावा !!
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरची जागा शिवसेना जिंकणारच आहे. मात्र दक्षिणमध्ये ही आमची चांगली ताकद निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर दक्षिण देखील शिवसेनेचेच आहे. कोल्हापूर दक्षिणचा आमदार देखील आम्हीच ठरवणार असे म्हणत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी भाजपला शिवसेनेची ताकद दाखवून देत एक प्रकारचा इशाराच दिला आहे. राजेश क्षीरसागर यांनी रविवारी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कळंबा येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, यावेळी ते बोलत होते.
उत्तरमधून लढण्यास भाजप ही इच्छुक
बहुतांश शहरी भाग असलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र २०१९च्या निवडणुकीत काँग्रेसने या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. तर पोटनिवडणुकीत देखील भाजप उमेदवाराला पराभूत करत काँग्रेसच्या उमदेवाराने मैदान मारले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने आपला दावा सांगितला आहे. तर राजेश क्षीरसागर यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र याच जागेवरून भाजप आणि शिवसेनेत जोरदार वाद सुरू झाला आहे.
What's Your Reaction?








