पाटापांगरा जंगलात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला !!
दैनिक जागर मराठी
घाटंजी:- पारवा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पाटापांगरा जंगल परिसरात सोमवारी दुपारी एक धक्कादायक प्रकार समोर आला. शिरोली येथील त्र्यंबक निकम (वय 65) यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत झाडाला लटकलेला मृतदेह आढळून आला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.घटनास्थळाची माहिती मिळताच पारवा पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चौधरी यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.घटनास्थळाची पाहणी व प्राथमिक तपासातून ही घटना आत्महत्येची असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.या प्रकरणाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. पोलीस पुढील सर्व तपास जलदगतीने करत आहेत.
What's Your Reaction?








