छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात शिवप्रेमींच्या अलोट उत्साहात शिवजयंती साजरी

Feb 23, 2024 - 07:16
 0  25
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात शिवप्रेमींच्या अलोट उत्साहात शिवजयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी/छत्रपती संभाजीनगर.

 छत्रपती संभाजीनगर:- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात अभूतपूर्व, नेत्रदीपक व अतिशय भव्यदिव्य पद्धतीने उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी असणारे छत्रपती शिवरायांचे पूर्णकृती पुतळे, प्रतिमा यांना आकर्षक पद्धतीने विद्युत रोषणाई व विविध फुलांनी सजवण्यात आले होते. सोमवारी सकाळपासून या ठिकाणी पांढरे शुभ्र वस्त्र, भगवे फेटे घालण्यात पुरुष व महिला वर्गाने पारंपारिक साड्या परिधान करत, व भगवे फेटे घालून हत्ती, घोडे, उंट, रथ यांचा समावेश करत भव्य मिरवणुका काढल्या होत्या. यावेळी सर्व शिवप्रेमी छत्रपती शिवरायांचा जयघोष करत महाराजांच्या पायाशी नतमस्तक झाले. यावेळी ठिकठिकाणी शिवचरित्रावर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. प्रमुख रस्त्यावर भगव्या पताका, ध्वज, फेटे यांनी वातावरण भव्यमय झाले होते. छत्रपती संभाजीनगर शहरातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली, यासाठी मागील काही दिवसापासून सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने नियोजन करण्यात आले होते. यामध्ये भव्यदिव्य असे मिरवणूक काढण्यात आले. यामध्ये महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या मिरवणुकीत हत्ती, घोडे, उंट आणि रथातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे वेष घेतलेल्या कलाकारांनी जनतेचे लक्ष वेधून घेतले. या मिरवणुकीसाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला होता. याशिवाय सहकार्यासाठी स्वयंसेवक मोठ्या संख्येने होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भागातही उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी वारकरी संप्रदायाच्या वतीने भजन कीर्तनाची कार्यक्रम तर महिला वर्गांनी शोभायात्रेमध्ये सहभागी होत पारंपारिक फुगडी खेळण्याचा आनंद घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगर येथे महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माचा पाळणा म्हणत, पान साखर वाटप करून हा जन्मदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी हजेरी लावली होती. याशिवाय उंट, घोडे यांचा समावेश करणारा जिवंत देखाव्यासह, वारकरी संप्रदायातील टाळ मृदुंगासह आवाज गाजत शोभयात्रा काढण्यात आली होती. गंगापूर, वैजापूर, फुलंब्री, कन्नड, खुलताबाद व संपूर्ण तालुक्यातील गावातही शिवप्रेमींनी अभूतपूर्व उत्साहा मध्ये शिवजयंती साजरी केल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow