इतिहासाचा अभ्यास आणि छत्रपती शिवराय

इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन न नाचा करा पदस्थल त्याचे आणि चढूनी त्यावर भविष्य वाचा

Jan 17, 2024 - 07:52
 0  65
इतिहासाचा अभ्यास आणि छत्रपती शिवराय

 ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विं.दा. करंदीकर सांगतात इतिहासातून मानवाला बोध घ्यायला हवा. परंतु मानव इतिहासाला कवटाळून बसतो. मग त्याच्या श्रद्धांना धक्का लागला की जाळपोळ, दंगली, आंदोलने त्यातून जीवित व वित्तहानी होतेच. खरं तर इतिहास म्हणजे समृद्ध भविष्याकडे नेणारा महामार्ग पण वर्तमान काळात विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचाही इतिहासाकडे बघण्याचा व अभ्यासण्याचा दृष्टिकोन हा खूपसा सकारात्मक दिसून येत नाही. त्याबद्दल त्यांच्या मनात अनेक गैरसमज असतात. जसे इतिहास म्हणजे होऊन गेलेल्या घटना. त्यांच्यावर आज चर्चा करण्यात काय अर्थ. कोळसा कितीही उगळला तरी  काळा तो काळाच राहतो. इतिहास विषयाचा अभ्यास म्हणजे मेलेले मुडदे उखडून काढण्याचा प्रकार. इतिहास विषय उत्पन्नाचे साधन होऊ शकत नाही. इतिहासाच्या अभ्यासाने पोट भरत नाही, इतिहास म्हणजे केवळ सन, सनावळ्या, घटना, आणि दिनांक यांचे जंजाळ. इतिहास म्हणजे गणित, विज्ञान किंवा तंत्रज्ञान नव्हे की ज्याचा आजच्या काळात उपयोग होईल. 
            इतिहास या विषयाचा राष्ट्राभिमानी शिक्षक या नात्याने मला हे योग्य वाटत नाही, मला त्यांना सांगावेसे वाटते की प्रत्येकच विषयाला स्वतःचा एक इतिहास असतो आणि तो अभ्यासल्याशिवाय आपण वर्तमानात त्यावर काम करू शकत नाही. आणि त्या संदर्भात भविष्यात प्रगतीच्या दिशाही निश्चित होऊ शकत नाहीत. खरंतर इतिहासाचा अभ्यास केल्याने आपल्या वर्तमानातील समस्या सुटण्यास निश्चितच मदत होते. त्यामुळेच भविष्य सुरक्षित होते. उदा. नुकत्याच येऊन गेलेल्या कोविड च्या साथीवर संपूर्ण जगाने व जगातील शास्त्रज्ञांनी उपाय शोधतांना हाच विचार केला की यापूर्वी जेव्हा-जेव्हा अशा प्रकारची साथ आली, तेव्हा - तेव्हा मानवाने त्यावर कशाप्रकारे मात केली. साधारणतः त्या मार्गदर्शक तत्त्वांचा उपयोग करूनच आपण कोविड वरील प्रतिबंधात्मक नियमावली व प्रतिबंधात्मक लस शोधून काढण्याचा प्रयत्न केला. त्यात आपण यशस्वी झालो. कोविड वर विजय मिळवला. त्यामुळेच भविष्याकडे अधिक जोमाने मार्गक्रमण करण्यासाठी सक्षम झालो. हे केवळ आणि केवळ इतिहासाच्या अभ्यासातून घडले. वर्तमान काळात भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे उत्तर इतिहासात सापडते. इतिहासाचा योग्य अभ्यास केल्यास त्या प्रश्नाचे उत्तर त्वरेने मिळते. त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही क्षेत्रात जर यशस्वी व्हायचे असेल तर त्या त्या क्षेत्राचा साद्यंत इतिहास माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. तो माहिती असेल तरच त्या क्षेत्रात आधी काय काम झाले ते कळू शकेल. वर्तमान कालखंडात त्यावर काम करतांना आता काय केले पाहिजे हे समजेल. अजून पुढे काय करायचे हे लक्षात येईल. त्यामुळे त्या क्षेत्रात आपण अधिक प्रगती करण्यास सक्षम होऊ. पण जर आपल्याला त्या क्षेत्राचा इतिहासच  माहीत नसेल तर चांगले यश मिळेल याची खात्री देता येत नाही. याशिवाय गतकाळात होऊन गेलेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून इतिहासाचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे असते. भूतकाळात झालेल्या चुका आपण खोडरबरने दुरुस्त करू शकत नाही, पण वर्तमानात त्या चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून प्रयत्न करू शकतो. जो समाज आपला इतिहास विसरतो त्याचे भविष्य निश्चितच अंधकारमय असणार.
                छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची स्थापना व विस्तार करताना ज्या संकटांचा सामना करावा लागला त्या संकटांवर मात करताना नियमितपणे इतिहासात, पुराणात घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास केल्याचे दिसून येते. थोडक्यात महाराजांनी इतिहासाचा सखोल अभ्यास केला होता. महाराजांनी बालपणात आईकडून रामायण, महाभारता सहित या भारत भूमीवर झालेल्या परकीय आक्रमकांच्या गोष्टी ऐकल्या. तशा रामायण महाभारता सहित अनेक गोष्टी सर्वच मुलांना सांगितल्या जातात. पण त्यातून शिवरायांनी जो बोध घेतला व त्याचे कालसापेक्ष जे अनुसरण केलं, ते छत्रपतींच्या कार्याचा अभ्यास करतांना आपल्याला पुन्हा - पुन्हा दृष्टीगोचर होताना दिसते. यातूनच महाराजांनी स्वराज्याची युद्धनीती - (वॉर पॉलिसी), युद्धरिती - (वॉर स्ट्रॅटेजी) तयार केली. युध्दनीती म्हणजे परक्यांचे भारतातून संपूर्ण निखंदन आणि युध्दरीती म्हणजे त्यासाठीच्या लढायांची रचना. उदा. शत्रुला आपल्या सोयीच्या रणक्षेत्रात आणून त्याचा संपूर्ण नि:पात करणे. महाभारतात श्रीकृष्णाने जरासंधाच्या कालयवनासारख्या अत्यंत रणधुरंधर बलाढ्य सेनापतीला मुचकुंदाच्या गुहेत नेऊन कसे ठार मारले याचा अभ्यास केला असणार. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी त्याला आपल्या सोयीच्या ठिकाणी म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी आणण्यासाठी महाराजांनी आखलेली योजना. मी आपणास फार घाबरलोय, तुम्हीच या आणि मला हात धरुन सुलतानाकडे न्या, असे सांगून आपल्या सोयीच्या जावळीच्या घनदाट जंगलात प्रतापगडाच्या पायथ्याशी आणले. प्रत्यक्ष भेटीत अफजलखानाचा वध करताना वापरलेली वाघनखे ही यापूर्वीच्या कोणत्याही युद्धात वापरलेली दिसून येत नाहीत. पण पुराणकालीन कथांचा अभ्यास केला तर हिरण्यकश्यपूचा वध करताना भगवान नरसिंह यांनी ज्या प्रकारे वाघनखांचा उपयोग केला कदाचित तिथूनच महाराजांना वाघनखे वापरण्याची कल्पना सुचलेली असू शकते. आग्र्याच्या काळकोठडीत असताना तिथून बाहेर पडण्यासाठी महाराजांच्या मनात ज्या अनेक गोष्टी रुंजी घालत असतील. त्यामध्ये प्रामुख्याने महाभारतात दुर्योधनाने ज्या प्रकारे शकुनीच्या माध्यमातून लक्षागृहात पांडवांना ठार मारण्याची योजना केलेली असते व त्यातून पांडवांनी कशाप्रकारे स्वतःची सुरक्षित सुटका करून घेतली हे स्पष्टपणे सांगितलेले आहे. याची आठवण महाराजांना नक्कीच झाली असणार. कदाचित त्यातूनच प्रेरणा घेऊन महाराजांनी आग्र्याच्या काळ कोठडीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधलेला असू शकतो. आजही महाराजांच्या आग्रा सुटके बद्दल इतिहास अभ्यासक संशोधन करीत असतात व त्यातील गूढ उकलण्याचा प्रयत्न करतात. पण त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांनी अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा स्वतःचे मानसिक धैर्य खचू न देता पुढील आठ नऊ वर्षातच 350 पेक्षा जास्त किल्ले मिळवत राजाभिषेकापर्यंत मजल मारली. अशीच प्रेरणा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीही महाभारतातून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून घेतलेली दिसून येते. भारताच्या स्वातंत्र्यलढयासाठी ब्रिटिशांच्या नजर कैदेत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस मोठ्या शिताफीने ब्रिटिशांच्या विख्यात हेरखात्याची नजर चुकवून मॉस्को मार्गे बर्लिनला पोहोचले व तेथून जपानला गेले. तेथे रास बिहारी बोस यांची भेट घेऊन आझाद हिंद फौजेचे नेतृत्व स्वीकारून ब्रिटिशांशी लढण्यासाठी भारताच्या ईशान्य भागात येऊन पोहोचले. मध्ययुगातील काही अपरिचित कारणांमुळे समुद्र लांघणे अयोग्य मानले जात होते. पण महाराजांनी रामायण महाभारतासहित पूर्वीच्या भारतीय राजांच्या विदेशी व्यापाराचा अभ्यास केला होता. जसे हनुमानाने समुद्र उल्लंघन करतच श्रीलंकेत प्रवेश केला,  इसवी सन पूर्व कालखंडा पासून सातवाहन, मौर्य, गुप्त सहित अनेक राजांचे पूर्व पश्चिमेकडील अनेक देशांशी समुद्रमार्गे व्यापार सुरू असल्याचे अनेक पुरावे मिळतात. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांना समुद्रमार्गे आपल्यावर परकीय आक्रमणे होऊ शकतात. शिवरायांनी भविष्यातला हा धोका ओळखून साडेतीनशे वर्षांपूर्वीच समुद्रात स्वराज्याचे भक्कम आरमार उभारले. महाराजांनी सुद्धा स्वराज्याचा व्यापार समुद्रमार्गे सुरू केला होता. महाराजांनी युद्धात घोड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला. कारण वेगवान हालचाली करण्यासाठी त्यांचाच उपयोग होतो. त्यांनी शक्यतो शत्रूशी लढताना हत्तींदळाचा वापर केला नाही किंवा स्वतः हत्तीवर बसून सैन्याचे संचालन केले नाही. कारण युद्धात हत्तीचा वापर किंवा हत्तीदळाचा वापर हा वेगवान हालचालीस अडथळा ठरतो. ही  गोष्ट यापूर्वीच्या अनेक युद्धांमध्ये दिसते. याशिवाय महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर - दऱ्यांमध्ये हत्ती व अवजड तोफा घेऊन युद्ध करणे व्यावहारिक दृष्ट्या योग्यही नव्हते.
                इसवी सन 712 मध्ये मुहम्मद बिन कासिम व सिंध चा राजा दाहिर यांच्यात झालेल्या युद्धात राजा दाहिर हा हत्तीवर बसून तर मोहम्मद बिन कासिम घोड्यावर स्वार होऊन सैन्याचे संचालन करत होते. राजा दाहिर  जखमी झाल्याने अंबारीत पडतो. आपला राजा पडला हे बघून त्याचे सैन्य रणांगणातून पळू लागते. परिणामी राजा दाहिरचा पराभव होतो. 1192 मध्ये सम्राट पृथ्वीराज चव्हाण व मोहम्मद घोरी यांच्यातील तराईच्या युद्धात सम्राट पृथ्वीराज चौहान हत्तीवर बसून तर मोहम्मद घोरी घोड्यावरून सैन्याचे संचालन करत असतो. युद्धात सम्राट पृथ्वीराज चौहानचा पराभव होतो. 1526 च्या पानिपतच्या पहिल्या युद्धात इब्राहिम लोधी हत्तीवरून लढत असतो तर बाबर घोड्यावरून त्याचा प्रतिकार करत असतो. या ठिकाणी इब्राहिम लोधीचाही पराभव होतो. त्यानंतर 1527 मध्ये खानवाच्या युद्धात पारंपारिक शस्त्रांच्या सहाय्याने राणासांगा हत्तीवरून सैन्याचे संचालन करतो तर तोफा व बंदूकाच्या साह्याने बाबर घोड्यावरून आपल्या सैन्याचे संचालन करतो. युद्धाच्या ऐन धूम्रश्चक्रीत राणासांगाला तीर लागतो. युद्धात राणासांगाचा पराभव होतो. 1556 मध्ये पानिपतच्या दुसऱ्या युद्धात अकबर व सम्राट हेमु यांच्यातील युद्धात सम्राट हेमु हत्तीवरून युद्ध करत असतो. सम्राट हेमुच्या डोळ्याला अचानक बाण लागतो तो अंबारीत कोसळतो. तो कोसळल्याचे दिसताच त्याचे सैन्य पळू लागते. परिणामी त्याचा पराभव होतो. 1565 ला राक्षसतागडीच्या युद्धात विजयनगर व बहामनी (दख्खन मधील पाच मुस्लिम सल्तनती) राज्यांमध्ये झालेल्या युद्धात रामराया हत्तीवरून आपल्या सैन्याचे संचालन करत असतो. रामरायाच्या तोफखान्याचा प्रमुख ऐन वेळी फितुरी करतो. त्यामुळे त्याचे तोफगोळे शत्रू ऐवजी रामरायाच्याच सैन्यावर पडतात. परिणामी रामरायाचा हत्ती बिथरतो रामराया हत्तीवरून खाली उतरतो. आपला सेनापती दिसत नाही म्हटल्यावर सैन्याचे मनोधैर्य खच्ची होते. परिणामी रामरायाचा पराभव होतो. 
                  वर या देशातील काही महत्त्वपूर्ण युद्धांचा उल्लेख केलेला आहे की ज्यामुळे सत्ता बदल झाले. त्या युद्धात झालेल्या आपल्या पराभवाची इतर अनेक कारणे आहेत. पण महत्त्वाचे म्हणजे या प्रत्येक युद्धात राजे हे स्वतः हत्तीवर बसून सैन्याचे संचालन करतांना दिसतात . आपले राजे हत्तीवर दिसतात तोपर्यंत त्यांचे सैन्य इर्षेने लढताना दिसते. सैनिकांच्या निष्ठा राजाशी असत. पण राजा पडताच त्यांचे सैन्य रणांगणा बाहेर पडे. परिणामी आपण अनेक जिंकत असलेल्या लढाया पण गमावल्या. मात्र शत्रु घोड्यावर स्वार असे. त्यामुळे त्याच्या हालचाली जलद होत. परकीय आक्रमक अचानक हल्ला करत. ते आक्रमण करण्यासाठीच आलेले असत. त्याच वेळी भारतीय राजे शांतताप्रिय असल्याने त्यांची युद्धाची तयारी आक्रमकाएवढी नसे. आक्रमक कोणत्याही युद्ध नियमांचे पालन करत नसत. या उलट भारतीय राजे मानवीय दृष्टिकोनातून युद्धाच्या नियमांचे पालन करत. उदाहरणार्थ स्वतः प्रथम आक्रमण करत नसत. त्यामुळे शत्रूला युद्ध सज्जतेला पूर्ण वेळ मिळे. शत्रू शरण आल्यास त्याला माफ करत. परकीय आक्रमकाला मात्र या गोष्टींची चाड नव्हतीच. लढाई जिंकल्यानंतरही ते सैनिकांशी, जनतेशी, महिलांशी अत्यंत अमानुषपणे विकृत व्यवहार करत. आक्रमकाकडे अधिक प्रगत शस्त्रास्त्रे होती भारतीय राजांकडे ती नव्हती किंवा त्याचे प्रमाण फार कमी होते. या गोष्टींचा छत्रपती शिवाजी महाराजांनी चांगलाच अभ्यास केलेला दिसून येतो. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे  महाराजांनी कधीही मिळालेल्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला नाही. याउलट निर्माण झालेल्या परिस्थितीचा जास्तीत जास्त स्वराज्य वाढीसाठी कसा उपयोग करून घेता येईल यावर अत्यंत सावध होऊन काम केले. महाराजांनी आपल्या सैन्याला कुणासाठी न लढता हिंदवी स्वराज्यासाठी लढण्याची आगळीवेगळी प्रेरणा दिलेली होती. म्हणूनच तर पुरंदरच्या युद्धात मुरारबाजी देशपांडे पडल्यावरही मराठे लढत होते. कोंढाण्यावर तानाजी मालुसरे पडल्यावरही मराठ्यांनी विजय मिळवला. 1680 मध्ये महाराज निवर्तल्यानंतर औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत (1707) पर्यंत स्वराज्यावर अनेक संकटे कोसळत असताना मराठे अनेक वेळेला नेतृत्वाविना लढले. त्या ठिकाणी अनेक निर्णय परिस्थिती बघून स्वतःच घेतले व विजयी झाले. पूर्वी अनेक युद्धांमध्ये शत्रूच्या अपुऱ्या माहितीमुळे आपला युद्धात पराभव होत होता. उदा. देवगिरीच्या रामदेवराय यादवांना अल्लाउद्दीन खिलजी गडाच्या पायथ्याशी येईपर्यंत समजलेच नव्हते की शत्रुने आपल्यावर आक्रमण केले आहे. खानवाच्या लढाईत  माहितीच्या अभावामुळेच राणासांगाला नाही कळले की बाबराकडे असलेला तोफखाना आणि बंदुका यांना तोंड कसे द्यावे. भारतीय राजांवर विजय मिळवणाऱ्या बहुतेक परकीय राजांकडे स्वतःचे राखीव दल असे. त्यामुळेच भारतीय राजांनी अनेकदा जिंकत असलेली युद्धे गमावली. उदा. अल्लाउद्दीन खिलजीचे देवगिरी येथे  रामदेवरायाशी झालेल्या या युद्धात पाठीमागे प्रचंड मोठी राखीव सेना असल्याची अवई अल्लाउद्दीन खिलजीने उठवून दिल्यामुळे रामदेवरायच्या सैन्याचे मानसिक धैर्य कोलमडते. त्यांना पराभव स्वीकारत नामुष्कीचा तह करावा लागतो. महाराजांनी आपल्या  गड, किल्ल्यावर राखीव दलाची वेगळी व्यवस्था केल्याचे दिसून येते. त्यांचे गुप्तहेरखाते प्रभावी असल्या कारणाने शत्रूचे मनसुबे, संकल्पना, शत्रूची विश्रांतीची वेळ, मनोरंजनाची वेळ, यासह युद्ध साहित्य, तोफा, दारूगोळा, शत्रुगोटातील खडान - खडा माहिती मिळे. त्यामुळे शत्रूवर केव्हा व कसे आक्रमण करायचे याचे संपूर्ण नियोजन महाराज आणि त्यांचे सेनानी आखत व त्यात कधीही चूक झाल्याचे दिसून येत नाही. महाराजांनी शत्रूवर अचानक केलेल्या हल्ल्यात शत्रु गाफील असल्यामुळे तो सावध होईपर्यंत महाराजांचे सैन्य शत्रूचे बरेच नुकसान करण्यात यशस्वी होत व शत्रू सावध होईपर्यंत महाराजांचे सैन्य तिथून निघूनही जात असे या संपूर्ण नियोजनात महाराजांच्या सैन्याचे काहीही नुकसान होत नसे किंवा अतिशय अल्प नुकसान होई या उलट शत्रूचे मोठे नुकसान होई शत्रूच्या मनात कायम भीती व दहशत निर्माण होई. त्यांनी ज्या युद्धतंत्राचा बेमालुमपणे वापर केला त्या युद्धतंत्राला 'गनिमीकावा' असे म्हणतात हे तंत्र त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाल्याचे दिसून येते. पुढे जगातील अनेक सेनापतींनी महाराजांच्या या युद्धतंत्राचा अभ्यास केला व यशस्वी रित्या वापरही केला.
            यापूर्वीच्या आपल्यावर झालेल्या अनेक आक्रमणांमध्ये असे दिसून येते की शत्रू ज्या प्रदेशात आक्रमण करत त्या प्रदेशातील केवळ राजा व सैन्य यांनाच लक्ष न करता सर्वसामान्य जनता व महिला वर्ग यांच्यावरही अन्याय व अत्याचार करत, शेतीची नासधूस करत, त्यामुळे रयतेच्या मनात या आक्रमकांविषयी एक प्रकारचा राग, संताप यासोबत भीती सुद्धा होती. महाराजांनी ज्या ज्या प्रदेशात आक्रमणे केली तेथील रयतेच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही याची काळजी घेतली, शेतीची नासाडी होऊ नये, पिकांचे नुकसान होऊ नये म्हणूनही काळजी घेत, महिलांशी अत्यंत सन्मानाने वागत. ही महाराजांची युद्धनीती होती. महाराजांच्या या धोरणामुळे महाराजांना रयतेकडून ज्या प्रमाणात सहकार्य मिळाले त्या प्रमाणात रयतेचे सहकार्य  त्यापूर्वीच्या राजांना मिळाल्याचे दिसत नाही. शत्रूच्या प्रदेशातील रयतेत सुद्धा महाराजांविषयी आत्मीयता निर्माण होई. महाराजांच्या या नीतीला त्यांच्या अनेक कट्टर शत्रूंनी सुद्धा चांगल्या शब्दात दाद दिली आहे. अनेक वेळेला भारतीय राजे युद्धात जिंकायचे पण तहात गमवायचे महाराजांनी या गोष्टीचा चांगलाच अभ्यास केलेला दिसून येतो त्यांनी केलेले सर्वच तह हे स्वराज्याच्या हिताचेच असत. अगदी नाईलाजास्तव कराव्या लागलेल्या पुरंदरच्या तहात सुद्धा महाराज अनेक महत्त्वाचे किल्ले स्वतःकडे ठेवून घेण्यात यशस्वी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ युद्धासाठीच नाही तर राज्य कारभार व्यवस्थित व्हावा, रयत सुखी राहावी म्हणून राज्यकारभार करताना सुद्धा इतिहासाचा आधार घेतल्याचे दिसून येते. अगदी मग रामायणातील रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणताना त्यांनी रघुनाथ नारायण हणमंते यांचेकडून राज्यव्यवहारकोष तयार करवून घेतला. हा राज्यव्यवहारकोष तयार करताना याआधी उत्तम राज्यकारभार असणाऱ्या विजयनगरच्या राज्यव्यवहारकोषा चा उपयोग केला व विजयनगरच्या राजांनी सुद्धा हा त्यांचा राज्यव्यवहारकोश  तयार करताना वेद उपनिषदांचा आधार घेतला होता. हे जागतिक दर्जाचे इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. म्हणूनच महाराजांची रयत त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत होती. रयत ही स्वराज्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास मागेपुढे पाहत नव्हती. कारण रयतेला स्वराज्य आपलेच वाटत होते.जणू प्रत्येकजण मी शिवाजी याच भूमिकेत जगत होता. याची अनेक उदाहरणे आपल्याला शिवचरित्रात मिळतात.
                 आज तुम्हीं आम्हीं सर्वांनी आपण निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करणे हाच एक शिवरायांचा मावळा म्हणून त्यांना केलेला मानाचा मुजरा असेल. त्या माध्यमातून  देशाचेही भविष्य उज्ज्वल करण्यासाठीच्या महासागररुपी कार्यात आपल्यामुळे एका थेंबाची निश्चितच भर पडेल. अशा असंख्य थेंबानी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळेच हा भारत देश उद्या आत्मनिर्भर होऊन जगात विश्वगुरु होईल यात शंकाच नाही. एक भारतमातेचा पुत्र म्हणून, एक राष्ट्राभिमानी शिक्षक म्हणून मी माझ्या देशाच्या उज्वल भविष्यासाठी 'इतिहासाचा अभ्यास आणि छत्रपती शिवराय' हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो या लेखामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासाच्या अभ्यासातून वर्तमानकालीन समस्या कशा प्रकारे सोडविल्या व त्यातून स्वराज्याची भविष्यवेधी वाटचाल कशी केली हे मांडण्याचा मी प्रयत्न केला. त्याचबरोबर मित्रांनो या लेखात इतिहासाच्या अभ्यासातून कशाप्रकारे आपण आपल्या वर्तमानकालीन समस्या सोडवू शकतो व त्यातून आपले भविष्य सुरक्षित व उज्वल होऊ शकते हे आजच्या दृष्टिकोनातून मांडण्याचाही प्रयत्न माझ्या अल्प बुद्धीप्रमाणे केला आहे. तुम्हीं माझे विचार काळजीपूर्वक वाचले याबद्दल मी आपला ऋणी आहे. माझ्या लिखाणातली न्यूनाधिक्य पुरते-सरते करून घ्यावे व कमी अधिक तीव्र रचनेबद्दल माफ करावे. "फोडिले भांडार धन्याचा तो माल | मी तो केवळ हमाल भारवाही||" ही तुकोबारायांची उक्ती तुम्हासारख्या  जाणत्यांकडून खरे तर सगळे काही घेऊनच मी हे माझे म्हणून लिहितो. याबद्दलही माझ्या लिखाणाचा उदार मनाने स्विकार करावा धन्यवाद.


लेखक 
प्रा.प्रशांत शिरुडे
के.रा.कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली. मो. 9967817876

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow