श्रीबालाजी खाटुश्याम मंदिराचा ११ वा स्थापना दिवस (पाटोत्सव) उत्साहात साजरा!!

Dec 21, 2025 - 16:26
 0  8
श्रीबालाजी खाटुश्याम मंदिराचा ११ वा स्थापना दिवस (पाटोत्सव) उत्साहात साजरा!!

दैनिक जागर मराठी 
संतोष वाघमारे
 धामणगांव रेल्वे  : राजस्थानमधील जयपूरजवळ सीकर येथे स्थित खाटुश्यामजी हे कलियुगातील सर्वधर्मीयांचे आराध्य दैवत मानले जाते. हारे का सहारा बाबा श्याम हमारा या अढळ विश्वासाने प्रेरित होऊन देश-विदेशातील भाविक खाटुश्यामजींच्या चरणी नतमस्तक होत आपल्या मनोकामना पूर्ण करतात. याच श्रद्धेच्या प्रभावातून विविध शहरांमध्ये व गावांमध्ये खाटुश्यामबाबांची मंदिरे उभारली जात आहेत. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे सुमारे १० वर्षांपूर्वी भव्य अशा श्रीबालाजी–खाटुश्याम मंदिराचे बांधकाम करण्यात आले. रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी या मंदिराचा ११ वा स्थापना दिवस (पाटोत्सव) विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. धामणगाव रेल्वे परिसरात श्यामबाबांच्या भक्तांची संख्या वाढत असताना मंदिर उभारणीची संकल्पना साकार झाली. जयरामदास भागचंद परिवाराच्या पुढाकारातून दोन मजली भव्य मंदिराचे बांधकाम करण्यात आले. मंदिराच्या देखरेखीकरिता श्रीबालाजी–खाटुश्याम सेवा समितीची स्थापना करण्यात आली असून समितीचे सदस्य नियमितपणे मंदिरसेवेत योगदान देत आहेत.समितीचे अध्यक्ष शरद अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर केवळ धार्मिक केंद्र न राहता सामाजिक सेवेचे केंद्र बनले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निराधार, दिव्यांग व गरजू व्यक्तींकरिता ३६५ दिवस घरपोच टिफिन सेवा अखंड सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ८० हजारांहून अधिक टिफिनचे वितरण करण्यात आले आहे. दररोज सकाळी ११ वाजता मंदिरातील कर्मचारी मोटारसायकलद्वारे २० ते २५ गरजू व्यक्तींना शुद्ध व पौष्टिक भोजन घरपोच पोहोचवतात. हे भोजन मंदिरातील स्वयंपाकगृहात तयार करून फॉइल पॅक डब्यात दिले जाते, जे सुमारे दोन तास गरम राहते. कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय दानशूर भाविकांच्या सहकार्याने ही सेवा सुरू आहे. ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाइकांनाही ही टिफिन सेवा दिली जाते.मंदिर परिसरात प्रेरणाकुंज उद्यान, योगध्यानासाठी कुटी, हिरवळीचा लॉन, फवारे, रंगीबेरंगी फुलझाडे तसेच अ‍ॅक्युप्रेशर पेव्हिंग ब्लॉक्ससह वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. लहान मुलांसाठी व भाविकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून वॉटर कूलरही उपलब्ध आहे. यासोबतच तुलादान सेवा, गौसेवा, महिलांसाठी नियमित योगा वर्ग असे विविध उपक्रम राबवले जातात.दरवर्षी कार्तिक शुक्ल पक्षातील देवउठणी एकादशीला श्रीश्याम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच २१ डिसेंबर रोजी स्थापना दिवस (पाटोत्सव) श्रद्धाभावाने साजरा केला जातो. यंदाही आज सायंकाळी ६.३० वाजता नागपूर येथील सुप्रसिद्ध भजन गायिका सुश्री कृष्णप्रिया यांच्या सुमधुर भजनांनी श्रीश्याम भजन संध्या रंगणार आहे. यावेळी श्रीश्याम बाबांच्या विग्रहाचा गुलाब, शेवंती, निशिगंधा व विविध फुलांनी मनमोहक शृंगार करण्यात येणार असून श्याम ज्योत प्रज्वलित ठेवली जाईल. छप्पन भोग अर्पणानंतर महाआरती होणार आहे.या पावन सोहळ्यास धामणगाव रेल्वे व परिसरातील सर्व धर्मीय भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीबालाजी–खाटुश्याम सेवा समितीतर्फे करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow