महायुतीची अडचण, मनसेची उमेदवारी मागे घेण्याचा मेसेज, राज ठाकरेंच्या भेटीनंतर 'इंजिन' यार्डात!!
नाशिक | नाशिकमध्ये महायुतीला अडचणीच्या ठरणाऱ्या काही जागांवर मनसे उमेदवारांना माघार घेण्याचा संदेश देण्यात आल्याची चर्चा रंगल्यानंतर नाशिक मध्यचे ‘मनसे’चे उमेदवार अंकुश पवार यांनी आपला प्रचार थांबवला आहे. ‘मनसे’चे इंजिनच यार्डात गेल्याने ‘नाशिक मध्य’बाबतचा सस्पेन्स वाढला आहे.
दुसरीकडे आता ‘नाशिक पूर्व’मधील मनसेचे उमेदवार प्रसाद सानप यांनी भाजपविरोधातील टीका वाढवल्याने त्यांची माघार होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ‘नाशिक मध्य’चे उमेदवार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच पुढचा निर्णय घेणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली असून, त्यात नाशिक मध्येही उमेदवार उभे करण्यात आले आहेत. नाशिक हा मनसेचा गड राहिल्याने नाशिक मध्य, पूर्व, पश्चिम, इगतपुरी, देवळालीसह अनेक ठिकाणी उमेदवार दिले. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसैनिकांमध्ये जोश निर्माण झाला होता. परंतु, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंसाठी भाजपने माघार घेतल्यानंतर मनसेनेही भाजपबाबत नरमाईचे धोरण स्वीकारल्याने भाजपकडील काही मतदारसंघांमध्ये मनसेच्या माघारी होणार आहेत.
What's Your Reaction?








