नावट वेबसाईट्स, ॲप्सपासून सावध रहा !!
दैनिक जागर मराठी
अमरावती — अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन आदी सेवांशी संबंधित बनावट वेबसाईट्स, फसवे मोबाईल ॲप्स (APKs) तसेच SMS/WhatsApp द्वारे पाठविल्या जाणाऱ्या खोट्या लिंक्सच्या माध्यमातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाच्या लक्षात आले आहे. या प्रकारांमुळे वाहन चालक व मालकांची आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहितीची चोरी तसेच नागरिकांच्या ओळखीचा गैरवापर होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे बनावट वेबसाईट व ॲप्स पासून सावधान राहण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे परिवहन विभागाने जारी केलेल्या एका पत्रकात सांगण्यात आले की, विभागाशी संबंधित सेवांसाठी नागरिकांनी केवळ अधिकृत शासकीय संकेतस्थळांचाच वापर करावा,वाहन नोंदणीसाठी VAHAN [https://vahan.parivahan.gov.in] ड्रायव्हिंग लायसन्ससाठी SARATHI ([https://sarathi.parivahan.gov.in] परिवहन सेवांसाठी [https://www.parivahan.gov.in] तसेच ई-चलनासाठी [https://echallan.parivahan.gov.in] या अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा. ही सर्व संकेतस्थळे “gov.in” या डोमेनने समाप्त होतात. “.com”, “.online”, “.site”, “.in” अशा डोमेनवरील कोणत्याही वेबसाईटवर नागरिकांनी व्यवहार करू नयेत. फसवणूक करणाऱ्यांकडून बहुधा “आपल्या वाहनावर चलन बाकी असून त्वरित दंड भरा” किंवा “DL सस्पेंड होणार आहे, त्वरित तपासणी करा” अशा धमकीवजा संदेशांसह अनधिकृत लिंक्स पाठविल्या जातात. परिवहन विभाग किंवा RTO कडून कधीही WhatsApp द्वारे पेमेंट लिंक पाठविली जात नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच “RTO Services.apk”, “mParivahan-Update.apk”, “eChallan-pay.apk” यांसारखी अनधिकृत ॲप्स डाउनलोड करू नयेत. अशा ॲप्सद्वारे OTP, बँकिंग तपशील व मोबाईलमधील संवेदनशील माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते. कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यास नागरिकांनी तात्काळ National Cyber Crime Portal [https://www.cybercrime.gov.in] वर तक्रार नोंदवावी किंवा सायबर फसवणूक हेल्पलाइन 1930 तसेच जवळच्या जिल्हा सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती उर्मिला पवार यांनी केले आहे.
-------------------------
मा. संपादक / वृत्त प्रतिनिधी,
यांना विनंती करण्यात येते की, सदर बातमी जनहितार्थ प्रसिद्ध करावी ही विनंती.
आपला
अनिल मानकर
जनसंपर्क अधिकारी,
प्रादेशिक परिवहन कार्यालय -अमरावती.
What's Your Reaction?








