नांदगाव पेठमध्ये विदर्भस्तरीय शंकरपटाचा थरार!!
दैनिक जागर मराठी
अमरावती : संत काशिनाथ बाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तब्बल वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नांदगाव पेठ येथे आजपासून विदर्भस्तरीय शंकरपट स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळणार आहे. ग्रामीण संस्कृतीचा आत्मा जपणारा आणि शेतकरी वर्गाचा उत्सव मानला जाणारा हा शंकरपट पाहण्यासाठी नांदगाव पेठसह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी, बैलजोडी धारक आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट आणि नामवंत धुरकऱ्यांची उपस्थिती यामुळे या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. कठोरा रस्तावरील मैदानावर युवा शेतकरी मित्र परिवार, नांदगाव पेठ तसेच स्व. सौ. हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ डिसेंबर रोजी या जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण आयोजनात पारंपरिक पद्धती, सुरक्षितता व्यवस्था आणि शिस्तबद्ध नियोजन यावर विशेष भर देण्यात आला असून, शंकरपटाची प्रतिष्ठा आणि ग्रामीण खेळांची परंपरा जपण्याचा आयोजकांचा उद्देश आहे. या स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरण सोमवारी मोठ्या थाटामाटात होणार आहे. या विदर्भ स्तरीय शंकरपटामध्ये अ गट, ब गट आणि ग्राम गट अशा विविध गटांमध्ये विदर्भातील नामांकित तसेच नवोदित धुरकरी आपली कौशल्ये पणाला लावणार आहेत. अ गटासाठी प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये, तर ब गटासाठी प्रथम बक्षीस २१ हजार रुपये ठेवण्यात आले असून, याशिवाय इतरही आकर्षक बक्षिसांचा समावेश आहे. त्यामुळे लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी धुरकऱ्यांना मिळणार असून, स्पर्धेचा थरार अधिक वाढला आहे. सकाळी ९ वाजता शंकरपटाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला आमदार राजेश वानखडे, विवेक गुल्हाने, सरपंच कविता डांगे, पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे, संजय चौधरी, ज्ञानेश्वर इंगळे आदी उपस्थित राहणार आहे. विदर्भातील विविध जिल्ह्यातून नामवंत धुरकरी पहिल्याच दिवशी नांदगाव पेठमध्ये दाखल झाले आहे. बैलजोड्यांची सजावट, सराव फेऱ्या आणि रंगतदार सामने पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. शंकरपटाच्या थरारक सामन्यांचा साक्षीदार होण्यासाठी नांदगाव पेठसह परिसरातील गावांमधून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, संपूर्ण परिसरात उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
What's Your Reaction?








