अकोला पोलिस दलात आकोट विभागाकरिता तिसरी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित वैज्ञानिक तपासाला मिळणार नवी गती!!
दैनिक जागर मराठी
अकोट : मा. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक अकोला यांनी दिनांक ८ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन ला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. भारतीय नागरी सुरक्षा संहिता, २०२३ अंतर्गत गुन्हे तपासातील वैज्ञानिक प्रणाली अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ही व्हॅन अकोला पोलिस दलात कार्यान्वित करण्यात आली आहे. यावेळी सुदर्शन पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट शहर विभाग यांची उपस्थिती होती.न्या.वै.प्र. संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्र. मुं/का/१४२३१-७५/२५ दि. २६.११.२०२५ तसेच सी.एस.एम. कॉम्प्युटर्स इंडिया लि. यांचे पत्र क्र. CMS/DFSL/२०२५/०५ नुसार उपविभागीय पोलीस अधिकारी, आकोट यांच्याकडे फॉरेन्सिक व्हॅन क्र. MH १२ YS ७९१५ प्रयोगार्थ प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, अमरावती मार्फत उपलब्ध झाली आहे. यासोबत खालील तज्ञ अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामध्ये श्रीमती साक्षी दीपक देवर सहाय्यक रासायनिक विश्लेषक,श्रीमती नेहा मनोज इंगळे सहाय्यक रासायनिक विश्लेषक, ओम नितीन बोंडफळे वैज्ञानिक सहायक, नागेश प्रल्हाद बावणे वैज्ञानिक सहायक,योगेश संजय मिसळे वाहन चालक, प्रविश दिगंबरराव इढोले वाहन चालक,आशिष गजानन ऐतवार प्रयोगशाळा परिचर, धनंजय मधुकर बुटे प्रयोगशाळा परिचर म्हणून आहेत. या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून होणारे महत्त्वपूर्ण लाभ: हि व्हॅन घटनास्थळी त्वरित पोहोचून भौतिक पुरावे सुरक्षित संकलित करता येणार तसेच पुरावे शास्त्रीय पद्धतीने संरक्षित करून चेन-ऑफ-कस्टडी कायम ठेवता येईल. घटनास्थळाचे फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी व सीन मॅपिंग व्यवस्थितरीत्या करता येईल. रक्त, केस, तंतू, धूळ, बोटांचे ठसे इ. जैविक नमुने घटनास्थळीच घेता येतील. प्राथमिक केमिकल व ट्रेस ॲनालिसिस मुळे त्वरित उपयुक्त माहिती मिळेल. तंत्रज्ञ घटनास्थळीच अत्याधुनिक उपकरणांद्वारे तपास करू शकतील. तपासासाठी आवश्यक तांत्रिक अहवाल जलद तयार करता येतील व न्यायालयात सादर करण्यासाठी विश्वसनीय पुरावे लवकर उपलब्ध होतील. संपूर्ण प्रक्रियेचा परिणाम म्हणून गुन्हे सिद्ध दर वाढीस मदत होणार आहे. अकोला जिल्ह्यात गुन्हे तपास अधिक परिणामकारक, वैज्ञानिक आणि गतिमान करण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन मोठी भूमिका निभावणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक व पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांनी व्यक्त केले.तसेच या मुळे गुन्हेगारीवर आळा बसेल.
What's Your Reaction?








