दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट, वकिलांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाकडून अवमान नोटीस, कारण काय?
मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यूची Disha Salian Death Case सीबीआय चौकशी व्हावी, याकरिता याचिका करणारे तिचे वडील सतीश सालियन यांचे वकील अॅड. नीलेश ओझा यांनी पत्रकार परिषदेत न्यायमूर्तींवर गंभीर आरोप केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने Mumbai High Court मंगळवारी त्यांच्याविरोधात स्वत:हून न्यायालय अवमानाची कायदेशीर कार्यवाही सुरू केली.‘ओझा यांची विधाने ही प्रथमदर्शनी न्यायालयाचा अवमान करणारी आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालय अवमान कायदा (बॉम्बे हायकोर्ट) नियम, १९९४च्या नियम ८ व नियम (१) अन्वये नोटीस बजावण्याचे निर्देश रजिस्ट्रीला देत आहोत’, असे मुख्य न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या पूर्णपीठाने आदेशात स्पष्ट केले.
सतीश सालियन यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आदित्य ठाकरे व अन्य काहींविरोधात एफआयआर नोंदवून सीबीआय चौकशीसाठी अॅड. ओझा यांच्यामार्फत याचिका केली आहे. त्यावरील सुनावणीपूर्वी ओझा यांनी १ एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ओझा यांनी उच्च न्यायालयातील विद्यमान न्यायमूर्ती तसेच माजी मुख्य न्यायमूर्तींवर आरोप केले. त्याची पूर्णपीठाने गंभीर दखल घेतली.
‘पूर्वी दिशाच्या मृत्यूप्रकरणात सुनावणीस विलंब केल्याने या न्यायमूर्तींविरोधात कायदेशीर कार्यवाहीसाठी राष्ट्रपतींकडे पूर्वसंमती मागितली होती. राष्ट्रपती कार्यालयाकडून विहित मुदतीत कळवण्यात आले नाही. त्यामुळे भारतीय न्याय संहिता, २०२३च्या कलम २१८ अन्वये मानीव पूर्वसंमती असते. तसेच कायदेशीर कार्यवाहीविषयी राष्ट्रपती कार्यालयाने तोंडी कळवले,’ असे ओझा यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
What's Your Reaction?








