दोन विभागांच्या सिंचन विहीर अनुदान रकमेत तफावत !!

Dec 16, 2025 - 16:00
 0  8
दोन विभागांच्या सिंचन विहीर अनुदान रकमेत तफावत !!

दैनिक जागर मराठी

नरेंद्र मेश्राम 
लाखनी :- महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत सिंचन विहिरीची अंदाजपत्रकिय रक्कम ४ लाख तर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरीची अंदाजपत्रकिय रक्कम ५ लाख रुपये असल्यामुळे अनुसूचित जाती जमातीचे शेतकऱ्यांवर अन्याय होत असून दोन्ही योजनांच्या विहिरीतील अनुदानातील तफावत दूर करण्यात यावी. अशी सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांनी मागणी केली आहे.  ग्रामीण परिसरातील कोरडवाहू शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी. या करिता महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाकडून सिंचन विहीर योजना राबविली जाते. सिंचन विहिरीचा लाभ घेऊन उत्पादनात भर पर्यायाने आर्थिक विकास व्हावा. असा शासनाचा उद्देश आहे. कृषी विभागाकडून अनुसूचित जाती च्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तर अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना चालविली जाते. या योजनेतील सिंचन विहिरीची अंदाजपत्रकिय रक्कम ४ लाख रुपये आहे. सध्या साहित्याच्या किमती वाढल्याने या रकमेत सिंचन विहीर बांधकाम करणे अशक्यप्राय बाब आहे. असे सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांचे म्हणने आहे.   अनुसूचित जाती जमाती शिवाय इतर प्रवर्गातील लाभार्थ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देता यावा. या करिता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वयक्तिक लाभ योजनेव्दारे सिंचन विहिरीचा लाभ देण्यात येत असून या सिंचन विहिरीची अंदाजपत्रकिय रक्कम ५ लाख रुपये आहे. शासनाकडून चालविण्यात येणाऱ्या दोन विभागाच्या सिंचन विहीर योजनेत जवळपास १ लाख रुपये तफावत ही अनाकलनीय बाब आहे. त्यामुळे मागासवर्गीय समजल्या जाणाऱ्या अनुसूचित जाती जमातीचे लाभार्थ्यांना ४ लाख रुपयांत विहीर बांधकाम करणे तारेवरची कसरत झाली आहे. या सिंचन विहीर योजनेवरून शासनाचा २ समुदायात दुफळी निर्माण करण्याचा तर प्रयत्न नसावा. असा संभ्रम निर्माण होत आहे. दोन्ही योजनेच्या सिंचन विहिरीच्या अटी व शर्ती जवळपास सारख्याच असताना अनुदानात तफावत का ठेवण्यात आली. हे एक कोडेच आहे. शासनाच्या सर्वच विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या सिंचन विहिरीची अनुदान रक्कम एकसमान करण्यात यावी. अशी सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांनी मागणी केली आहे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow