२६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या हाफिज भुट्टावीच्या मृत्युच्या वृत्ताला युएनचा दुजोरा

मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारा लश्कर-ए-तैयबाचा संस्थापक सदस्य हाफिज अब्दुल सलाम भुट्टावी याच्या मृत्यूवर संयुक्त राष्ट्राने शिक्कामोर्तब केले आहे. भुट्टावी हा हाफिज सईदचा निकटचा साथीदार आणि त्याचा डेप्युटीही होता.
दहशतवादी हाफिज अब्दुल सलाम भुट्टावी याचा मृत्यू २९ मे, २०२३ रोजी झाला होता. मात्र, संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्या वेबसाइटवर अधिकृतरीत्या या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता. आता मात्र या मृत्यूच्या वृत्तावर संयुक्त राष्ट्राने शिक्कामोर्तब केले आहे. पंजाब प्रांतात पाकिस्तान सरकारच्या कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला होता.
पाकिस्तानच्या मुरीदके भागात लश्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाची स्थापना करणारा भुट्टावी प्रतिबंधित दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा प्रमुख आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याचा डेप्युटी होता. जमात-उद-दावा ही लश्कर-ए-तैयबाची प्रमुख दहशतवादी संघटना आहे. ७७ वर्षीय भुट्टावी याला दहशतवादी संघटनांना निधी पुरवल्याप्रकरणी ऑक्टोबर २०१९मध्ये लाहोरपासून सुमारे ६० किमी दूर असलेल्या जिल्ह्यातील शेखुपुरा तुरुंगात कैद करण्यात आले होते.
What's Your Reaction?






