जय श्रीराम: राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान मोदींचे ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान
देशासह जगभरात सध्या अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेची चर्चा आहे. साऱ्या देशवासीयांचा उत्साह दिसून येत आहे. येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना उद्देशून एक ऑडिओ संदेश जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदेशामध्ये राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“जीवनाचे काही क्षण ईश्वराच्या आशीर्वादामुळेच प्रत्यक्षात उतरत असतात. आज जगभरातल्या राम भक्तांसाठी असंच पवित्र वातावरण आहे. सर्वत्र प्रभू श्रीराम यांच्या भक्तीचं अद्भुत वातावरण आहे. चारही दिशांना रामनामाचा जप ऐकू येतो आहे. प्रत्येकाला २२ जानेवारीची प्रतीक्षा आहे. आता अयोध्येत प्राणप्रतिष्ठेसाठी फक्त ११ दिवस उरले आहेत. या पुण्यप्रसंगाचा साक्षीदार होण्याची संधी मिळत आहे. ही कल्पनेच्या पलीकडची अनुभूती आहे. याप्रसंगी भावुक झालो आहे. पहिल्यांदा आयुष्यात अशा प्रकारच्या मानसिक स्थितीतून जात आहे. हा अनुभव एक वेगळीच संधी आहे,” असं नरेंद्र मोदी आपल्या संदेशामध्ये म्हणाले आहेत.
“अनेक पिढ्यांनी वर्षानुवर्षं जे स्वप्न उराशी बाळगलं होतं, मला त्या स्वप्नपूर्तीवेळी उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं आहे. ईश्वराने मला सर्व भारतीयांचं प्रतिनिधित्व करण्याचं निमित्त बनवलं आहे. ही फार मोठी जबाबदारी आहे,” अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.
What's Your Reaction?