शिवम दुबेचं वादळी अर्धशतक, पहिल्या टी20 सामन्यात भारताचा सहा विकेटनं विजय

Jan 12, 2024 - 08:58
 0  31
शिवम दुबेचं वादळी अर्धशतक, पहिल्या टी20 सामन्यात भारताचा सहा विकेटनं विजय

IND vs AFG Live Updates: शिवम दुबेच्या झंझावाती अर्धशतकाच्या बळावर पहिल्या टी 20 सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा सहा विकेटनं पराभव केला. शिवम दुबे याने 40 चेंडूत 60 धावांची खेळी केली. त्याशिवाय जितेश शर्मा यानेही 20 चेंडूत 31 धावांचं मोलाचं योगदान दिलं. अफगाणिस्तानकडून मुजीब आर रहमान याने दोन विकेट घेतल्या. मोहाली टी 20 सामन्यात विजय मिळवत तीन सामन्याच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली. 

अफगाणिस्तानने दिलेल्या 159 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा एकही धाव न करता तंबूत परतला. रोहित शर्मा धावबाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि शुभमन गिल यांनी डाव सावरला. पण ठरावीक अंतराने भारताने विकेट फेकल्या. शुभमन गिल 12 चेंडूत 23 धावा काढून बाद झाला. त्याने पाच चौकारांच्या मदतीने 23 धावांचे योगदान दिले. तिलक वर्मा याने 22 चेंडूत 26 धावा केल्या. यामध्ये दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तिलक वर्मा आणि शुभमन गिल ठराविक अंतराने बाद झाल्यानंतर शिवम दुबे आणि जितेश शर्मा यांनी डाव सावरला. दोघांनी मोठे फटके मारत वेगानं धावसंख्या वाढवली. 

शिवम दुबे याने 40 चेंडूत नाबाद 60 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता. जितेश शर्माने याने 20 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 31 धावा जोडल्या. फिनिशर रिंकू सिंह याने 9 चेंडूत नाबाद 16 धावा केल्या.  अफगाणिस्तानकडून मुजीब आर रहमान याने दोन विकेट घेतल्या. तर उमरजई याला एक विकेट मिळाली. फारुखी, नबी, नवीन यांची विकेटची पाटी कोरीच राहिली.

अफगाणिस्तानची 158 धावांपर्यंत मजल

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहालीच्या मैदानात अफगाणिस्तान संघाने संयमी सुरुवात केली. इब्राहिम जादरान आणि रहमानुल्लाह गुरबाज यांनी 50 धावांची सलामी दिली. कर्णधार जादरान याने 22 चेंडूत 25 धावांचे योगदान दिले. यामध्ये एक षटकार आणि दोन चौकारांचा समावेश आहे. तर गुरबाज याने 28 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 23 धावांची खेळी केली. अजमतुल्लाह उमरजई याने तिसऱ्या क्रमांकावर संयमी आणि महत्वाची खेळी केली. पण रहमत शाह बाद झाल्यामुळे अफगाणिस्तानची धावगती मंदावली होती. रहमत शाह याला फक्त तीन धावाच करता आल्या. 

अफगाणिस्तानचा फिनिशिंग टच -

झटपट तीन विकेट गेल्यानंतर अनुभवी मोहम्मद नबी याने अजमतुल्लाह उमरजई याच्या साथीने डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 43 चेंडूत 68 धावांची भागिदारी केली. अफगाणिस्तानचा संघ मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असतानाच मुकेश कुमार याने जोडी फोडली. अजमतुल्लाह उमरजई याला 29 धावांवर तंबूत पाठवले. तर मोहम्मद नबी यालाही 42 धावांवर बाद केले. अजमतुल्लाह उमरजई याने 22 चेंडूत एक षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 29 धावा केल्या. तर नबी याने 27 चेंडूत झटपट 42 धावा केल्या. यामध्ये तीन षटकार आणि दोन चैकारांचा समावेश होता. अखेरच्या दोन षटकांमध्ये नजीबुल्लाह जादरान याने झटपट धावा केल्या. त्याने चार चौकारांच्या मदतीने 19 धावांचे योगदान दिले. करीम जनत यानेही दोन चौकारांच्या मदतीने 9 धावा केल्या. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow