'आता बस झालं, IPL आयोजकांशी बोलणार'; घरच्या मैदानावर आणखी एक पराभव, अजिंक्य रहाणेचं सडेतोड उत्तर !!
मुंबई : ईडन गार्डनच्या खेळपट्टीवरून सुरू झालेला वाद थांबण्यास तयार नाही. ‘मी काही बोललो तर वाद पुन्हा होईल’, अशी टिप्पणी करणाऱ्या अजिंक्य रहाणेने खेळपट्टीस लक्ष्य केले. ‘खेळपट्टीने फिरकी गोलंदाजांना काहीही साथ दिली नाही’, अशी टीका त्याने मंगळवारी केली.
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ घरच्या मैदानावर पुन्हा पराभूत झाला. त्यामुळे रहाणे निराश होता. त्याने शब्द जपून वापरण्याचा प्रयत्न केला खरा; मात्र त्याच्याकडून बोचरी टिप्पणी झालीच. या सामन्यात फिरकी गोलंदाज वर्चस्व राखतील, अशी आशा होती. प्रत्यक्षात या सामन्यात जवळपास पाचशे धावा झाल्या. प्रथम गोलंदाजी करण्याचा अजिंक्य रहाणेचा निर्णय कोलकाता नाईट रायडर्सला भोवला. ते विजयी लक्ष्यापासून पाच धावांनी दूर राहिले.
‘‘एका बाजूची सीमारेषा जास्त अंतरावर होती. हे लक्षात घेऊन ‘लखनऊ'ने फलंदाजी तसेच गोलंदाजी केली. निकोलस पूरन आणि मिचेल मार्शची फलंदाजी खूपच सुरेख होती. त्यांनी धोका पत्करत धावांना वेग दिला. खेळपट्टीबाबत काय बोलणार, ती चांगलीच होती. पाचशेहून जास्त धावा झाल्या. गोलंदाजांचा जास्त कस पणास लागला’, असे रहाणेने म्हणाला.
आयपीएल आयोजकांशी साधणार संवाद?
"खेळपट्टीबाचत खूप काही बोलले गेले आहे. त्याची खूपच चर्चा झाली. आता मी काही बोललो तर वाद होईल" अशी कोपरखळी अजिंक्य रहाणे याने हसत-हसत मारली. मात्र प्रश्न थांबले नाहीत. थेट क्यूरेटर सुजन मुखर्जी यांच्याबाबत विचारणा केली. 'आमच्या क्यूरेटरना खूपच प्रसिद्धी मिळाली आहे. त्यांना ते आवडतही असावं. घरच्या मैदानावर खेळण्याच्या फायद्याबाबत तुम्हाला जे वाटेल ते लिहू शकता. मला काही सांगायचे असेल, तर त्याची इथे (पत्रकार परिषदेत) चर्चा करण्याऐवजी मी आयपीएल आयोजकांना सांगेन', असे रहाणेने सुनावले.
What's Your Reaction?








