अयोध्येला भेट द्या… तुम्हाला त्रेतायुगात गेल्यासारखे वाटेल’

Jan 12, 2024 - 08:47
 0  36
अयोध्येला भेट द्या… तुम्हाला त्रेतायुगात गेल्यासारखे वाटेल’

येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोमाने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. या सोहळ्यासाठी निवडक मान्यवरांनाच निमंत्रित करण्यात आले असले तरी नंतर रामभक्त मोठ्या उत्साहाने तेथे दाखल होणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यानंतर अयोध्येला भेट देण्याचे आवाहन सोमवारी रामभक्तांना केले आहे. ‘तुम्ही अयोध्येला नक्की भेट द्या. तुम्हाला त्रेतायुगात गेल्यासारखे वाटेल,’ असे आवाहन त्यांनी केले आहे.

‘अयोध्येत ‘श्री राम जन्मभूमी चळवळ सुरू असताना विश्व हिंदू परिषद तिचे नेतृत्व करत होती. या मोहिमेसाठी साधूसंत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मार्गदर्शन लाभले होते. आम्ही म्हणायचो, जेव्हा सगळे भारतीय एकावेळी ‘जय श्रीरामाचा उद्घोष करतील, तेव्हा राम मंदिराचा प्रश्न मिटेल,’ असे योगी म्हणाले. मथुरेत साध्वी रितंभरा यांच्या षष्ठ्याब्दीपूर्ती सोहळ्यानिमित्त ते बोलत होते.

‘तुम्ही २२ जानेवारीनंतर अयोध्येला आवर्जून भेट दिली पाहिजे. तुम्हाला त्रेतायुगात आल्यासारखे वाटेल. आता तर अयोध्येत विमानतळही सुरू होत आहे. आता प्रभू राम त्यांच्या पुष्पक विमानाने या भूतलावर उतरतील,’ असे ते म्हणाले. ‘ पंतप्रधान ३० डिसेंबर रोजी अयोध्येला आले. आता तुम्ही येथील पायाभूत सुविधा पहा. अयोध्या आता रस्ते आणि हवाई वाहतूक मार्गाने जोडली गेली आहे. आता जलमार्गानेही अयोध्यानगरीला जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत,’ असे योगी यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow